जिल्हा परिषद ७ जागांसाठी ५५, पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ उमेदवार
अलिबाग : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत अलिबाग तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ५५, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ अर्ज असे एकुण १५० अर्ज दाखल झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, १८ जानेवारीपर्यंत पौष महिना होता. तो अशुभ मानला जात असल्याने उमेदवारांनी १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली. त्यातच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करताना प्रतिस्पर्धी पक्ष कोणता उमेदवार देतो याची चाचपणी सुरू ठेवली, तसेच युती-आघाड्यांची गणिते जुळतात का, याचाही अंदाज बांधला जात होता.
त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात विलंब झाला. युती, आघाडीचे प्रयत्नही केले जात होते. बंडखोरी टाळण्यासाठीदेखील राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यात विलंब केला. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. काही उमेदवारांनी अगदी शेवटची १५ मिनिटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वेळ साधतानाही अनेक उमेदवारांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता होती. राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उशिरा उमेदवारी जाहीर करण्याचा फंडा अवलंबला. शेवटपर्यंत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. उमेदवारी जाहीर होत नसल्याने उमेदवार आणि त्यांचे समर्थक टेन्शनमध्ये होते. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी निवडणूक कार्यालयाकडे धाव घेतली.
रायगड जिल्ह्यात यावेळी युती विरुद्ध आघाडी असे चित्र सध्यातरी दिसत आहे; परंतु काही ठिकाणी विचित्र आघाड्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप काही ठिकाणी शिवसेनेबरोबर, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. युती-आघाडीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही गणिते जुळली, तर अर्ज मागे घेतले जातील. अर्ज मार्ग घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी आहे. तोपर्यंत पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.






