Thursday, January 22, 2026

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना महायुतीचा महापौर होणार असल्याने मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या वतीने एक ते दोन तसेच तीन टर्म नगरसेवक पद भूषवणाऱ्या नगरसेविकांची नावे चर्चेत येत आहे. यामध्ये प्राधान्याने राजेश्री शिरवडकर, अलका केरकर, योगिता कोळी, प्रिती सातम, रितू तावडे, जागृती पाटील तसेच शीतल गंभीर आदींची नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या महिलांपैंकी कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते की पक्ष चर्चेत नसलेल्या नगरसेविकेला महापौरपदाच्या खुर्चीत बसवून धक्का तंत्र आजमावतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, महापौर पद भाजपकडे गेल्यास उपमहापौरपद हे शिवसेकडे जावू शकते आणि यासाठी समृध्दी कातेसह शैला लांडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

मुंबईच्या महापौर पदाचे आरक्षण काय पडेल याची सर्वांना उत्सुकता शिगेला लागली होती. अखेर याची आरक्षण सोडत जाहीर झाली असून यामध्ये मुंबईचा महापौर हा सर्वसाधारण महिला प्रवर्गातील अर्थात खुल्या महिला प्रवर्गातील असेल हे जाहीर झाले आहे. त्यामुळे महायुतीचा आणि पर्यायाने भाजपचा महिला नगरसेवक हा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये निवडून आलेल्या आणि एक पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १७२मधून निवडून आलेल्या राजेश्री शिरवडकर, प्रभाग क्रमांक ९८मध्ये निवडून आलेल्या अलका केरकर, प्रभाग क्रमांक १००मधून स्वप्ना म्हात्रे, प्रभाग ४६मधून योगिता कोळी, प्रभाग ५२मधून निवडून आलेल्या प्रिती सातम, प्रभाग क्रमांक १३२मधून निवडून आलेल्या रितू तावडे, प्रभाग क्रमांक १९०मधून निवडून आलेल्या शीतल गंभीर आदींची नावे चर्चेत आहेत. परंतु यात राजेश्री शिरवडकर, योगिता कोळी, प्रिती सातम, रितू तावडे यांची नावे आघाडीवर आहेत.

Comments
Add Comment