मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका (BMC) आता पुन्हा एकदा महिला राजवटीसाठी सज्ज झाली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीत मुंबईचे महापौरपद 'खुल्या प्रवर्गातील महिला' (Open Female) गटासाठी आरक्षित झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण असून आता महापौरपदासाठी भाजपकडून दावा ठोकला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्या महायुतीने निर्भेळ यश संपादन केले आहे. २२७ सदस्यांच्या सभागृहात सत्तेसाठी ११४ हा आकडा आवश्यक असताना, महायुतीकडे तब्बल ११८ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हे आता तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत "महायुतीचा महापौर बसेल" अशी सावध भूमिका घेणाऱ्या भाजपकडून आता आक्रमक पवित्रा घेतला जाऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे, 'खुल्या प्रवर्गातील महिला' आरक्षण निघाल्याने भाजपकडे या गटातील निवडून आलेल्या सक्षम आणि अनुभवी महिला नगरसेविकांची मोठी फळी उपलब्ध आहे. मुंबईवर आपला वरचष्मा निर्माण करण्यासाठी भाजप हे पद आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खुल्या प्रवर्गातून आरक्षण निघाल्याने अनेक अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दारे उघडली आहेत. महायुतीमध्ये अनुभवी नेत्यांपासून ते आक्रमक महिला नगरसेविकांपर्यंत अनेक नावे शर्यतीत आहेत. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि प्रशासकीय पकड असलेल्या महिला उमेदवाराला संधी देऊन, आगामी काळासाठी मुंबईच्या सत्तेचे केंद्र मजबूत करण्याकडे भाजप आणि शिवसेनेचा कल असेल.
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत अखेर आज मंत्रालयात पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ ...
मुंबईतले भाजपचे महापौर पदाचे दावेदार कोण?
- राजश्री शिरवडकर
- अलका केरकर
- हर्षिता नार्वेकर
- रितू तावडे
- आशा मराठे
- शितल गंभीर
योगिता सुनील कोळी यांनी भाजपच्या तिकीटावर मालाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांचं नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे. मुंबईतील दहीसर येथील वॉर्ड क्रमांक २ मधून तेजस्वी घोसाळकर निवडून आल्या. त्या दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत जाणार आहेत. मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी विजय मिळवला. त्याआधी शिवसेनेत होत्या. पण मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपत प्रवेश करुन विजय मिळवला.
भाजपकडे अनेक पर्याय
मुंबई महापालिकेत यंदा एकूण १३० महिला नगरसेविका निवडून आल्या. त्यात भाजपकडे ८९ पैकी ४९ महिला नगरसेविका आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ६५ पैकी ३८ महिला नगरसेविका आहेत. मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होणार म्हणून आम्ही चर्चेतली दोन नाव नमूद केली असली, तरी भाजपकडे पालिका प्रशासनाच्या कारभाराचा दीर्घ अनुभव असलेली अनेक महिला नगरसेविका आहेत.





