माघी गणपती जयंती हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म झाला आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. माघ महिन्यात शुद्ध चतुर्थीच्या दिवशी साजरी होणारी माघी गणेश जयंती ही भगवान गणेशांच्या जन्मोत्सवाची महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी गणरायाचा जन्म झाल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात भाविक मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची पूजा, अभिषेक, उपवास आणि आरती करतात. विशेषतः पहाटेच्या वेळी गणेशपूजन करून दुर्वा, मोदक आणि फुलांची अर्पण केली जातात. माघी गणेश जयंतीला केलेली मनोभावे प्रार्थना संकटांपासून मुक्ती देणारी, बुद्धी, यश आणि समृद्धी प्रदान करणारी ठरते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला 'माघी गणेश जयंती' साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस मानला जातो. यंदा गुरुवारी,२२ जानेवारी २०२६ रोजी ही जयंती साजरी केली जात आहे . भाद्रपदातील गणेश चतुर्थीप्रमाणेच या दिवसाला विशेष महत्त्व असून, या तिथीला 'तिलकुंद चतुर्थी' किंवा 'वरद चतुर्थी' असेही संबोधले जाते. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचा जन्म याच दिवशी झाल्याने भाविक मोठ्या उत्साहात हा जन्मोत्सव साजरा करतात.
माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळसाखरेचा नैवेद्य दाखवण्याची विशेष परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी लाभते. या दिवशी भाविक पहाटे उठून पाण्यात तीळ टाकून स्नान करतात आणि दिवसभर उपवास धरतात. अलीकडच्या काळात मंदिरांप्रमाणेच अनेक सार्वजनिक मंडळांमध्येही माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाऊ लागला आहे.






