लखनऊ : उतर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक फसवणुकीचे प्रकरण उघड झाले आहे. एका महिलेने पतीकडून घटस्फोट मिळवता यावा आणि प्रियकरासोबत राहता यावे म्हणून पतीला गोहत्येच्या प्रकरणात अडकवण्यासाठी बनाव रचला. हा प्रकार सीसीटीव्ही फूटेजमुळे उघड झाला. पोलिसांनी बनाव रचणाऱ्या आफरिन आणि तिच्या प्रियकराला अटक केले आहे.
नक्की प्रकरण काय ?
ही घटना १४ जानेवारी रोजी मलिहाबाद आणि काकोरी दरम्यान घडली. गोहत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान एका ऑनलाईन डिलिव्हरी वाहनातून (ई-रिक्षा) मांस जप्त करण्यात आले. ही डिलिव्हरी आफरीनच्या पती सलमान (काही नोंदींमध्ये वासिफ) यांच्या मोबाईल क्रमांकावरून आणि ओटीपीद्वारे बुक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला संशय पतीवर गेला; मात्र पुढील तपासात संपूर्ण चित्र बदलले.
पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, ओटीपी जनरेट होण्याच्या वेळी पती बाथरूममध्ये होता, तर त्याची पत्नी आफरीन त्याचा मोबाईल वापरत असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासात आफरीन बराच काळ भोपाळ येथील अमानच्या संपर्कात असल्याचे आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचेही उघड झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमान १४ जानेवारी रोजी भोपाळहून मांस घेऊन लखनऊला आला होता. त्याने बनावट ओळखीचा वापर करून ऑनलाईन डिलिव्हरी बुक केली, तर आफरीनने गुपचूप पतीच्या मोबाईलवरील ओटीपी देऊन डिलिव्हरी कन्फर्म केली होती. पतीला अडकवण्यासाठी दोघांनीच काही संघटना आणि पोलिसांना माहिती दिली होती.
तपासात सप्टेंबर २०२५ मध्येही अशाच प्रकारे पतीच्या गाडीत मांस ठेवून त्याला तुरुंगात पाठवण्यात आल्याचे समोर आले असून, तो सुमारे एक महिना कारागृहात होता. या प्रकरणी पोलिसांनी आफरीन आणि अमान यांच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच उत्तर प्रदेश गोवध प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.