‘तारीख पे तारीख’ सुरूच
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’चे सत्र सुरूच राहिले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे बुधवारी शिवसेनेचे प्रकरण सूचिबद्ध करण्यात आले होते. मात्र प्रकरण ३७ व्या क्रमांकावर होते. त्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे गृहीत धरून वकिलांनी न्यायालयाला पुढील तारखेबाबत विनंती केली. न्यायालयाने ती विनंती ऐकण्यास नकार देत काही आठवड्यांनंतर सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान शिवसेनेची सुनावणी बुधवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे निश्चित करण्यात आली होती. जानेवारीत सलग दोन दिवस सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने नोव्हेंबरमध्येच जाहीर केले होते.
राज्यात पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. किमान त्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा फैसला होईल, अशी चर्चा होती. संपूर्ण राजकीय वर्तुळाचेही सुनावणीकडे लक्ष लागले होते. मात्र बुधवारी पुन्हा अपेक्षाभंग झाला आणि शिवसेनेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे समर्थंक आमदारांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. २०२२ मध्ये आयोगाने घेतलेल्या त्या निर्णयाला उबाठा सेनेचे प्रमुखांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांची याचिका मागील तीन वर्षे प्रलंबित आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रकरण वेळीच निकाली निघण्याची अपेक्षा होती. मात्र बुधवारी उबाठा गटाचा पुन्हा अपेक्षाभंग झाला.
राज्यातील महापालिका निवडणूका संपून ठिकठिकाणी सत्ता संपादनासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. महापालिकेत विरोधात लढलेले घटक सत्तेसाठी हातमिळवणी करत असतानाच सुनावणी लांब पडल्याने अनेकांची निराशा झाली आहे.






