मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील नौकानयनपटू जोरदार तयारी करत आहेत. या अंतर्गत ‘सेल इंडिया २०२६’ आणि आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणी - भाग २ या महत्त्वपूर्ण स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे झाला. स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या ‘बीएमसी – आर्मी सेलिंग स्कूल’ मधील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना साहसी नौकानयन क्रीडेची प्रत्यक्ष ओळख मिळत असून, भविष्यातील गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.
‘सेल इंडिया २०२६’ आणि आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणी - भाग २ या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी देशभरातील १८ क्लब व संस्थांमधील सुमारे १५० नामांकित नौकानयनपटू सहभागी झाले आहेत. विविध ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये या स्पर्धा होत आहेत. विविध चाचण्यांद्वारे २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.
स्वराज्यभूमी येथे या स्पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र–गुजरात क्षेत्र मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल सलील सेठ, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव, महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, स्वराज्यभूमी संदर्भातील उच्चस्तरीय समितीच्या सदस्या इंद्राणी मलकानी यावेळी उपस्थित होते. क्रीडावृत्ती, शिस्त आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्याच्या उद्दिष्टावर भर द्यावा, असे आवाहन सलील सेठ यांनी केले. तसेच, या निवड चाचण्या भारतीय नौकानयनाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेदेखील नमूद केले.
महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांनी सांगितले की, ‘सेल इंडिया २०२६’ या स्पर्धेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तळागाळातील क्रीडा विकासावर देण्यात येणारा विशेष भर होय. भारतीय लष्कर व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीएमसी – आर्मी सेलिंग स्कूल’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना नौकानयनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना साहसी नौकानयन क्रीडेची प्रत्यक्ष ओळख मिळत असून, भविष्यातील सक्षम व गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.






