पुणे : डेटिंग अॅपवर आरोपीची आणि पिडीत तरुणाची ओळख झाली अन् मध्यरात्री पेट्रोल पंपाजवळ भेटायचं अमिष दाखवून त्याला बोलावून घेतलं. यानंतर त्याच्याकडुन ८० हजारांची रोकड घेऊन व दागिने लुटुन चोरटे पळाले. या प्रकरणी आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करत चौघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना पुण्यातील कोंढवा येथे घडली आहे.
राहिल अकिल शेख (वय १९, रा. सोमजी, कोंढवा), शाहीद शानूर मोमीन (वय २५, रा. कात्रज), रोहन नईम शेख (वय १९, रा. कोंढवा बु.), इशान निसार शेख (वय २५, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय तरुण वाघोली परिसरात राहतो. ११ जानेवारी रोजी तो मोबाइलवर डेटिंग ॲप वापरत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. ओळख वाढल्यानंतर आरोपीने ‘कुठे राहतोस?’ अशी चौकशी करत रात्री नऊच्या सुमारास कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंपाजवळ भेटण्यास बोलावले.
तक्रारदार तेथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या तिघांनी त्याला धारदार हत्याराचा धाक दाखवला. त्यानंतर त्याला कोंढव्यातील पानसरेनगर परिसरातील मोकळ्या जागेत नेऊन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्याच्याकडील मोबाइल व सोन्याची अंगठी हिसकावून घेतली तसेच एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडले. एकूण सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपी पसार झाले.
तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चौघांना अटक केली. दरम्यान, डेटिंग ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.