Thursday, January 22, 2026

Pakistan Karachi Massive Fire : पाकिस्तानमध्ये अग्नितांडव! अख्खी इमारत जळून खाक, तब्बल 'इतक्या' जणांचा होरपळून मृत्यू

Pakistan Karachi Massive Fire : पाकिस्तानमध्ये अग्नितांडव! अख्खी इमारत जळून खाक, तब्बल 'इतक्या' जणांचा होरपळून मृत्यू

कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात एका बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देश हादरला आहे. या आगीतील बळींची संख्या आता ६१ वर पोहोचली असून, बचावकार्य जसजसे पुढे सरकत आहे, तसतशी मृतांची आकडेवारी वाढत आहे. या दुर्घटनेत एकाच दुकानातून अनेक मृतदेह हाती लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आगीतील सर्वात वेदनादायक दृश्य 'दुबई क्रॉकरी' नावाच्या दुकानात पाहायला मिळाले. अग्निशमन दलाच्या जवानांना या एकाच दुकानातून तब्बल ३० मृतदेह सापडले आहेत.

३० जणांचा होरपळून मृत्यू

इमारतीला आग लागल्यानंतर आणि धूर पसरू लागल्यानंतर, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुकानदार आणि ग्राहकांनी दुकानाचे शटर आतून ओढून घेतले होते. बाहेरून येणारी आग आणि धूर आत येऊ नये, या आशेने त्यांनी स्वतःला कोंडून घेतले; मात्र दुर्दैवाने त्याच बंद दुकानात धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की इमारतीचा बराचसा भाग कोळसा झाला आहे. अनेक लोक अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात असून, ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुबई क्रॉकरी दुकानात ३० जणांचा गुदमरून मृत्यू झाला. धुरापासून वाचण्यासाठी शटर बंद केल्याने ऑक्सिजन संपला आणि गुदमरून मृत्यू ओढवला. सध्या मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

७३ जण अजूनही बेपत्ता; मृतांमध्ये १६ चिमुरड्यांचा समावेश

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १०० च्या वर जाण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. सिंध प्रांतीय सरकारने अधिकृतरीत्या ७३ बेपत्ता व्यक्तींची यादी जाहीर केली असून, ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बेपत्ता लोकांमध्ये महिला, वृद्ध आणि विशेषतः लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या ७३ बेपत्ता व्यक्तींच्या यादीत १० ते ६९ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये किमान १६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही मुले एकतर या इमारतीमधील दुकानांमध्ये मजुरी करत होती किंवा पालकांसोबत खरेदीसाठी आली होती. या चिमुकल्यांच्या नशिबी असा दुर्दैवी अंत आल्याने संपूर्ण कराची शहर सुन्न झाले आहे. "इमारतीमधील अग्निसुरक्षेचे उपाय कोणत्याही मानकानुसार (Standards) नव्हते," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आपत्कालीन मार्ग नसणे, अग्निशमन यंत्रणांचा अभाव आणि अवैध बांधकामांमुळे आगीने भीषण रूप धारण केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

इमारतीचे ३ खटले न्यायालयात प्रलंबित होते, तरीही 'डेथ ट्रॅप' सुरूच राहिला

कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी स्पष्ट केले की, बाधित कुटुंबे आणि दुकानदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांची आणि बेपत्ता लोकांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, ढिगारा उपसणे आणि शोधमोहीम राबवणे हे अतिशय कठीण काम आहे. अग्निशमन दलाच्या अंदाजानुसार, संपूर्ण शोधमोहीम पूर्ण करण्यासाठी किमान १० ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने सखोल तपास सुरू केला आहे. इमारतीला परवानगी देणारे अधिकारी आणि मालक यांच्यावर कारवाईचे संकेत दिले जात आहेत. अनेक मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे गेल्याने आता डीएनए चाचणीच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

Comments
Add Comment