Thursday, January 22, 2026

Mumbai Local Train : आता लोकल ट्रेनवर सुध्दा CCTV कॅमेरे मध्य रेल्वेचा निर्णय; पण CCTV का जाणुन घ्या ?

Mumbai Local Train : आता लोकल ट्रेनवर सुध्दा CCTV कॅमेरे मध्य रेल्वेचा  निर्णय; पण CCTV का जाणुन घ्या ?
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनसमोर होणाऱ्या अपघातांचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी आणि चौकशी अधिक पारदर्शक करण्यासाठी केबिनच्या बाहेर उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांसह मोटरमनलाही मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे रुळांवर आत्महत्या, अचानक समोर येणारे अडथळे, सिग्नल बिघाड किंवा लोकलच्या समोरून होणारे अपघात याबाबत आतापर्यंत केवळ मोटरमनचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र अनेकदा या जबाबांमध्ये तफावत आढळत असल्याने अपघाताचे खरे कारण स्पष्ट होत नव्हते. यामुळे काही वेळा मोटरमनवर चुकीचे आरोपही होत होते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी या प्रकल्पाबाबत माहिती मागवली असता, मध्य रेल्वेच्या ताफ्यातील मोठ्या प्रमाणावर लोकल ट्रेनमध्ये मोटरमन केबिनबाहेर CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेकडे एकूण १६४ लोकल गाड्या असून त्यापैकी १६१ लोकलमध्ये CCTV कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित लोकलमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या CCTV फुटेजमुळे अपघातानंतरची चौकशी अधिक अचूक, पारदर्शक आणि पुराव्यांवर आधारित होणार आहे. अपघातासाठी मोटरमन जबाबदार आहे की बाह्य कारणांमुळे दुर्घटना घडली, रुळांवर अडथळा होता का, सिग्नलमध्ये बिघाड झाला होता का, याची स्पष्ट माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोटरमनचे चुकीच्या आरोपांपासून संरक्षण होणार असून भविष्यातील अपघातांचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
Comments
Add Comment