Thursday, January 22, 2026

मुंबई, पुण्यात महिलाराज : राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई, पुण्यात महिलाराज : राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत अखेर आज मंत्रालयात पार पडली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. विशेषतः मुंबई, पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये महिलांसाठी महापौर पद राखीव झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सोडतीनुसार अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी ३ महापालिका, अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १ महापालिका, इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी ८ महापालिका, तर खुल्या प्रवर्गातील १७ महापालिकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे अनेक ठिकाणी सत्तेची गणिते बदलणार असून, पक्षांना नव्या महिला नेतृत्वाला पुढे आणण्याची संधी मिळणार आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी तब्बल १५ महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहेत. ५० टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार ही विभागणी करण्यात आली आहे. अहिल्यानगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर या चार महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर असतील. लातूर आणि नवनियुक्त जालना महानगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.

महापालिकानिहाय आरक्षण पाहिले असता, मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, नाशिक, मालेगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नांदेड येथे खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाले आहे. ठाणे येथे अनुसूचित जाती प्रवर्ग, तर कल्याण-डोंबिवली येथे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. उल्हासनगर, पनवेल, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, चंद्रपूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले आहे. नागपूर, अमरावती, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि वसई-विरार या महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे.

  मुंबईत ही नावे चर्चेत

विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणानुसार महापौर पदासाठी तेजस्वी घोसाळकर, योगिता कोळी, प्रीती सातम, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, साक्षी दळवी, अर्चना भालेराव, अश्विनी मते, राखी जाधव, रितू तावडे, राजेश्री शिरवाडकर, शीतल गंभीर आणि हर्षिता नार्वेकर ही नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

  महापालिकानिहाय महापौर पदाचे आरक्षण

मुंबई – सर्वसाधारण (महिला)

नवी मुंबई – सर्वसाधारण (महिला)

ठाणे – अनुसूचित जाती प्रवर्ग (SC)

मिरा-भाईंदर – सर्वसाधारण (महिला)

कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती प्रवर्ग (ST)

उल्हासनगर – ओबीसी प्रवर्ग (OBC)

वसई-विरार – सर्वसाधारण

भिवंडी-निजामपूर – सर्वसाधारण (महिला) आरक्षण

पनवेल – ओबीसी प्रवर्ग (OBC)

नाशिक – सर्वसाधारण (महिला)

अहिल्यानगर – ओबीसी प्रवर्ग (OBC) – महिलांसाठी राखीव

मालेगाव – सर्वसाधारण (महिला)

जळगाव – ओबीसी प्रवर्ग (OBC) – महिलांसाठी राखीव

धुळे – सर्वसाधारण (महिला)

नागपूर – सर्वसाधारण

अकोला – ओबीसी प्रवर्ग (OBC) – महिलांसाठी राखीव

अमरावती – सर्वसाधारण

चंद्रपूर – ओबीसी प्रवर्ग (OBC) – महिलांसाठी राखीव

पुणे – सर्वसाधारण (महिला) आरक्षण

पिंपरी-चिंचवड – सर्वसाधारण (महिला) आरक्षण

सांगली – सर्वसाधारण

कोल्हापूर – ओबीसी प्रवर्ग (OBC)

इचलकरंजी – ओबीसी प्रवर्ग (OBC)

सोलापूर – सर्वसाधारण

छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण

परभणी – सर्वसाधारण

जालना – अनुसूचित जाती प्रवर्ग (SC) – महिलांसाठी राखीव

लातूर – अनुसूचित जाती प्रवर्ग (SC) – महिलांसाठी राखीव

नांदेड – सर्वसाधारण (महिला)

Comments
Add Comment