Thursday, January 22, 2026

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा जवान जखमी झाले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार २२ जानेवारी रोजी जवानांची बुलेटप्रूफ कॅस्पिअर गाडी एका मोहिमेवर जात होती. प्रवासादरम्यान डोडा घाटात गाडी ४०० फूट खोल दरीत कोसळली. भदरवाह - चंबा खन्नी मार्गावरून जात असताना दरीत कोसळली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घटनेची माहिती मिळताच एक्स पोस्ट करुन शोक प्रकट केला.

लष्करी वाहन दरीत कोसळल्याची माहिती मिळताच लष्कराने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी जवानांना हेलिकॉप्टद्वारे उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रतिकूल हवामान असताना प्रवास सुरू होता. या प्रवासादरम्यान एका टप्प्यावर चालकाने नियंत्रण गमावले आणि वाहन दरीत कोसळले. या प्रकरणी नियमानुसार लष्करी अधिकारी तपास करत आहेत. अपघाताची सविस्तर चौकशी करुन अधिकारी वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अपघाताची माहिती मिळताच शोक प्रकट केला. संरक्षणमंत्र्यांनी जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment