७२ अर्ज दाखल; आज छाननी
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ता. २१ अलिबागमध्ये सुमारे ७२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी आजपासून होणार आहे. यानंतर निवडणुकीचे एकूण चित्र स्पष्ट होणार आहे.
१६ जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांत केवळ एक अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर चौथ्या दिवशी शेकाप-महाविकास आघाडी, भाजप, शिवसेना शिंदेसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. अलिबागमध्ये शहापूर, आंबेपूर, आवास, थळ, चेंढरे, चैल व कावीर असे सात जिल्हा परिषद गट, तसेच वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चैल, काविर, रामराज असे १४ पंचायत समिती गण आहेत. या सर्व ठिकाणी शेकाप-महाविकास आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले. थळ जि. प. गटातून शेकापकडून सानिका सुरेश घरत, चेंढरे आरती प्रफुल्ल पाटील, थळ नलिनी मदन बना, चैल सुरेश शांताराम खोत, आवास संदिप विलास गायकवाड, चेंढरे दर्शना रणजित राउत, काविर मधुकर ढेबे, काविर मोहन धुमाळ, आंबेपूर पूजा अमित भगत, थळ रिमा मनिष पडवळ, शहापूर अनिल गोमा पाटील, शहापूर सत्यविजय शंकर पाटील यांनी आपले अर्ज दाखल केले. यासोबतच भाजपच्या प्रियदर्शनी पाटील यांनी चेंढरे गटातून आणि गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे पती संजय पाटील यांनी चेंढरे गणातून, अर्चना संदीप घरत यांनी चौल गणातून उमेदवारी दाखल केली. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल गटातून, जिल्हा युवा अधिकारी राजा ठाकूर यांनी काविर गटातून उमेदवारी अर्ज भरले. राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित नाईक यांनी शहापूर गटातून अर्ज भरला. आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या (शिंदे गट) अधिकृत उमेदवार म्हणून रसिका राजा केणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दुपारी ३ वा. पर्यंत आलेल्या उमेदवारांना टोकन दिले. जोपर्यंत अर्ज तपासणी होऊन छाननीबाबत तसेच काही चुका असतील, तर त्याबाबत नोटीस दिली जात नाही, तोपर्यंत कार्यालय सोडून जाऊ नये, अशा सूचना अधिका-यांनी केल्या होत्या.






