Thursday, January 22, 2026

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शीव उड्डाणपुलावर होणारी वाहनांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने आता या पुलाला समांतर असा एक नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी व्हीजेटीआय (VJTI) संस्थेने आपला तांत्रिक अहवाल सादर केला असून, हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सध्या शीव उड्डाणपुलावरून ठाणे आणि पूर्व उपनगरांकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, तर दक्षिण मुंबईत सीएसएमटीच्या दिशेने येण्यासाठी केवळ एकच मार्ग उपलब्ध आहे. यामुळे विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. आता नवीन समांतर पूल उभारल्यामुळे ठाण्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहनांना एक थेट आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांचा इंधन आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. कोणताही पूल उभारण्यापूर्वी तो तांत्रिकदृष्ट्या किती सक्षम असेल आणि त्याचा वाहतुकीवर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करणे आवश्यक असते. या पुलामुळे शीव परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा सकारात्मक अहवाल संस्थेने दिला आहे. या अहवालानंतर आता महापालिका लवकरच या कामाचे कार्यादेश (Work Orders) जारी करणार असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल. एककीडे समांतर पुलाची तयारी सुरू असतानाच, महापालिकेने सध्याच्या जुन्या शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे कामही हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने, त्याच्या मजबुतीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. समांतर पुलाच्या उभारणीनंतर हा संपूर्ण पट्टा 'ट्रॅफिक फ्री' होण्याच्या दिशेने पाऊल पडणार आहे.

अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची मोठी माहिती

शीव उड्डाणपुलाला समांतर पूल बांधणे तांत्रिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या शक्य आहे का? याची चाचपणी करण्याची जबाबदारी नामवंत व्हीजेटीआय संस्थेवर सोपवण्यात आली होती. संस्थेने आपल्या सखोल अभ्यासानंतर हा प्रकल्प पूर्णपणे 'व्यवहार्य' (Feasible) असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. या अहवालामुळे महापालिकेचा मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला असून, प्रकल्प अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले की, पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे अनिवार्य आहे. पुलाचे काम सुरू असताना या परिसरातील वाहतूक वळवावी लागेल, ज्याचा परिणाम दैनंदिन प्रवासावर होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांशी चर्चा सुरू असून, एनओसी मिळताच या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जमिनीवर सुरू होईल.

कसा असेल हा मार्ग?

मुंबई महापालिकेकडून केशवराव खाडये मार्गावरील पूर्वेकडे उभारण्यात येणाऱ्या महालक्ष्मी केबल स्टेड उड्डाणपुलाचा विस्तार एन. एम. जोशी मार्गासह एस ब्रिज जंक्शनजवळ आणि हाजी अली जंक्शनजवळून महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंत केला जाणार होता. हे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. मात्र वाहतूक पोलिसांनी या कामाला ना हरकत प्रमाणपत्र जाहीर केले नसून या ठिकाणी पूल आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. विस्तारित कामच रद्द झाल्याने याच कंत्राटदाराला शीव उड्डाणपुलाला समांतर पूल उभारण्याचे काम देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >