बिहारमधील राजकीय घडामोडींची खडानखडा माहिती असणाऱ्या नितीन नबीन यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला आता दक्षिणायन करून तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल पादाक्रांत करायचा आहे. अर्थात मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या छत्रछायेखाली कारभार चालणार असल्यामुळे त्यांना ताण घेण्याचे काहीच कारण नाही.
अजय तिवारी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात जेन झीने आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. जगभर आता जेन झी क्रांतीची मशाल हाती घेत असताना भारतातही तसे व्हावे, अशी राहुल यांची इच्छा असली, तरी राहुल यांच्या पक्षाची धुरा अजूनही ज्येष्ठांच्या हातात आहे. निवडणूक जिंकून द्यायला युवक आणि पदे मात्र ज्येष्ठांना, यामुळे तर काँग्रेसला कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्ये फटका बसला. यालट, सत्तेतील महत्त्वाची पदे भाजपची ज्येष्ठ मंडळी भूषवत असली, तरी संघटनात्मक तसेच अन्य पदांवर युवक आणि मध्यमवयीन नेत्यांची वर्णी लावून भाजपने संतुलन साधले. आता मोदी हेही जेन झीला आकर्षित करत आहेत. पश्चिम बंगालमधील त्यांचे भाषण ऐकल्यास त्यात त्यांनी युवकांच्या भावनांना हात घातलेला दिसतो. दिल्लीत मोदी यांच्याविषयी आयोजित पुस्तक प्रदर्शनामागेही जेन झीच्या भावनांचा उद्रेक न होता ते आपल्याबरोबर कसे राहतील, ही व्यूहनीती होती. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची धुरा ४५ वर्षांच्या नितीन नबीन यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली बढती भाजपमध्ये एका पिढीतील बदलाचे संकेत देते. नबीन यांना नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय केवळ एक महत्त्वाचा संघटनात्मक निर्णय नाही, तर राष्ट्रीय राजकारणाला एक स्पष्ट संदेशदेखील देतो. भाजपमध्ये नेतृत्वाचा मार्ग वय किंवा वंशावळीने नव्हे, तर कठोर परिश्रम, ऊर्जा आणि संघटनात्मक क्षमतेने ठरवला जातो, हा या निवडीमागील संदेश आहे. केवळ ४५ वर्षांच्या नबीन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून पक्षाने सिद्ध केले आहे, की भाजप भविष्यातील राजकारणावर लक्ष ठेवून तरुण नेतृत्व जोपासते. दुसरीकडे, काँग्रेसचे नेतृत्व ८३ वर्षीय मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर आहे. नबीन यांची नियुक्ती ही केवळ एक नियुक्ती नाही, तर पक्षामध्ये पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांचे प्रतीक आहे. १९८० मध्ये स्थापनेपासून, पक्षाने अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कुशाभाऊ ठाकरे यांसारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपला वैचारिक आणि संघटनात्मक पाया मजबूत केला. त्यांच्यापाठोपाठ, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांच्यासह दुसऱ्या पिढीने, तर धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकूर यांच्यासह तिसऱ्या पिढीने पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा विस्तार केला आणि पक्षाला सत्तेत आणले. आता चौथी पिढी म्हणून भाजपने नबीन यांची निवड केली आहे. नबीन हे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी अमित शहा यांनी ४९व्या वर्षी पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्यापूर्वी नितीन गडकरी ५२व्या वर्षी अध्यक्ष झाले होते.
ताज्या निवडीने भाजपने तरुणांना थेट संदेश दिला आहे, की वय हा पक्षात अडथळा नाही. नबीन हे कायस्थ समुदायातून येतात. त्यांची संख्या निवडणुकीच्या राजकारणात निर्णायक मानली जात नाही. असे असूनही, त्यांना पक्षाच्या सर्वोच्च पदावर नियुक्त केल्याने दिसून येते, की भाजप नेतृत्व निवडीमध्ये जातीच्या अंकगणितापेक्षा संघटनात्मक क्षमता आणि राजकीय समजुतीला प्राधान्य देत आहे. संघटनेत काम करणारा, जमिनीशी जोडणारा आणि निवडणूक आव्हाने समजून घेणारा कार्यकर्ता वरच्या स्थानी पोहोचू शकतो. प्रादेशिक संतुलनाच्या दृष्टिकोनातून नबीन यांची निवड महत्त्वाची आहे. ते बिहारचे आहेत आणि भाजपचे पूर्व भारतातून येणारे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यावरून स्पष्ट होते, की पक्षाचे लक्ष हिंदी पट्ट्यापुरते किंवा पश्चिम भारतापुरते मर्यादित नाही. भाजप बिहार, बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करू इच्छित आहे. नबीन यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे, परंतु २०२९ च्या लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील हे निश्चित आहे. त्यांच्या आधी पक्षाने लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन शहा आणि नंतर नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला होता. म्हणूनच त्यांची टीम तरुण आणि अनुभवी नेत्यांमध्ये संतुलन राखत असल्याचे म्हटले जाते. पक्ष संघटनेत महिलांसाठी ३३ टक्के प्रतिनिधित्वाची तरतूद असून नवीन टीममध्ये महिला आणि तरुण चेहऱ्यांना आघाडीवर आणण्याची योजना आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकार बारा वर्षांपासून सत्तेत असताना नबीन यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका याच वर्षी होणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये १५ वर्षांपासून सत्तेत आहे. बिहार आणि ओडिशानंतर, भाजपचे पूर्वेकडील सर्वात मोठे आव्हान म्हणजे बंगालमध्ये कमळ फुलवणे. तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुका याच वर्षी होणार आहेत. भाजप केरळमध्ये वीस टक्के मते मिळवत आहे; परंतु त्याचा उपयोग जागा जिंकण्यात होत नाही. तिरुवनंतपुरममध्ये भाजपने महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. पक्ष तिसरी शक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकाही लवकरच होणार आहेत. तिथे द्रमुक-काँग्रेस युती दहा वर्षांपासून सत्तेत आहे. अण्णाद्रमुक आणि इतर पक्षांशी युती करून पक्ष पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. पुद्दुचेरीमध्ये सत्ता टिकवून ठेवणेदेखील आव्हानात्मक आहे. देशातील ६५ टक्के लोकसंख्या सध्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. भाजप अध्यक्ष म्हणून नबीन यांच्यावर भाजपचा पाठिंबा राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. नबीन यांची नियुक्ती तळागाळातून सुरू झालेल्या आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेल्या व्यापक अंतर्गत निवड प्रक्रियेचा परिणाम आहे. ही नियुक्ती भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे आणि आगामी महत्त्वाच्या राज्यातील निवडणुकांपूर्वी बदलावर भर देण्याचे लक्षण म्हणून पाहिली जाते. त्यांनी बिहारमधील पक्षाच्या युवा संघटनेपासून सुरुवात केली आणि निवडणुकीच्या जबाबदाऱ्या स्वीकारत उच्च पदांवर पोहोचले. यातील एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे छत्तीसगड तसेच दिल्लीमध्ये भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यामध्ये नबीन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






