Thursday, January 22, 2026

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात

मुंबई : महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मर्यादित जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या १ हजार ४६२ जागांसाठी सुमारे १३ हजार उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. अनेक ठिकाणी एका जागेसाठी दहा ते पंधरा उमेदवार रिंगणात असल्याने बहुकोनी लढती होण्याची शक्यता आहे.

कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २७२ अर्ज दाखल झाले असून, पंचायत समितीच्या १०० जागांसाठी तब्बल ४४१ उमेदवार मैदानात उतरले आहेत. लोकसंख्या तुलनेने कमी आणि राजकीय क्षेत्र मर्यादित असतानाही अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि ग्रामपातळीवरील राजकारणामुळे येथे अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ अर्ज तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले आहेत. काही तालुक्यांमध्ये एका जागेसाठी सहा ते आठ उमेदवार रिंगणात असून, पारंपरिक राजकीय पक्षांसह नव्या चेहऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज भरले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. पुण्यात जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी ८५३ अर्ज तर पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १ हजार ४८२ अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी सर्वाधिक ९०७ अर्ज आले असून, पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी १ हजार ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी ९६७ अर्ज आणि पंचायत समितीच्या ११० जागांसाठी १ हजार ३६० अर्ज दाखल झाल्याने तेथेही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

सातारा, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही अर्जांची संख्या मोठी असून, अनेक ठिकाणी थेट लढतीऐवजी बहुकोनी संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे लातूर, परभणी आणि रायगड जिल्ह्यांत अर्ज अपेक्षेपेक्षा जास्त दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने मतदारांसमोर यंदा मोठ्या प्रमाणावर पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल काय लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २७ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांना या टप्प्यातून वगळण्यात आले आहे. २७ जानेवारी ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

Comments
Add Comment