वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. नियमांनुसार, एक वर्षाच्या नोटीसनंतर २२ जानेवारी २०२६ पासून अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेची सदस्य राहणार नाही.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत तब्बल ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांतून बाहेर पडत असल्याची अधिकृत घोषणा आठ जानेवारी २०२६ रोजी केली आहे. अमेरिका संयुक्त राष्ट्रांशी संबंधित असलेल्या ३१ आणि संयुक्त राष्ट्रांशी संबंधित नसलेल्या ३५ आंतरराष्ट्रीय संघटनांतून बाहेर पडणार आहे. अमेरिका ज्या संस्थांमधून बाहेर पडणार आहे त्यात इंटरनॅशनल सोलर अलायन्स, संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी या मोठ्या संस्था आहेत.
ट्रम्प समर्थक २०२५ आणि २०२६ मध्ये घेतलेल्या या मोठ्या निर्णयांना अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे रक्षण आणि करदात्यांच्या पैशांची बचत अशा विचारांतून बघत आहेत. तर अनेक आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.







