Wednesday, January 21, 2026

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता  कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात यावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी 'तात्पुरता मंडप उभारणी' परवानगीकरिता ऑफलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच मंडप उभारणी परवानगीसाठी १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन नद्या,समुद्र,तलाव किंवा इतर नैसर्गिक पाणीसाठ्यांमध्ये न करता; महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे व भाविकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

माघी श्रीगणेशोत्सवात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीने पार पडावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्व आवश्यक उपाययोजना व अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ तसेच ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी जारी केलेल्या सुनिश्चित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणीही सुयोग्य प्रकारे करण्यात येत आहे.

६ फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार रंगीत रसायने, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य इत्यादी घटक पाण्यात विसर्जित करण्यास बंदी आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी तसेच भाविकांनी निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >