मुंबई : सिरीयल किलरच्या कथांवर आधारित थ्रिलर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. याच धाटणीतील एक नवी वेब सिरीज म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकरची ‘दलदल’. या सिरीजचा अधिकृत ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील वातावरण आणि हिंसा पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.
नुकताच समोर आलेला ट्रेलर हा भयानक आणि अस्वस्थ करणारा आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या आसपासच्या या व्हिडिओत रहस्य, रक्तरंजित गुन्हे आणि मानसिक ताण यांचा भडिमार पाहायला मिळतो. ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही सिरीज प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांमध्ये सलग खून दाखवण्यात आले असून, हे गुन्हे अत्यंत अमानुष पद्धतीने केल्याचं ट्रेलरमधून समोर येतं. या सर्व हत्यांमागे एकच व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि कथा गुंतत जाते ती भूमी पेडणेकरच्या भूमिकेमुळे. ती एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असली तरी, कथेत तिच्यावरच संशयाची सुई फिरते. दिवसा कायद्याची रक्षक आणि रात्री गुन्ह्यांशी संबंधित असण्याची शक्यता दाखवली गेल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. भूमी पेडणेकरने साकारलेली ही गंभीर आणि काळी छटा असलेली भूमिका तिच्या आतापर्यंतच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचं अनेकांनी नमूद केलं आहे. ही थरारक वेब सिरीज येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून, ट्रेलरमुळेच ‘दलदल’ आधीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे.