नितीन यांनी भाजपच्या विजयाचा केवळ दावाच केला नाही, तर निकालाचा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यानंतर देशात झालेल्या निवडणुकीवेळीही त्यांचा अंदाज अचूक ठरला, तेव्हाच या तरुणाकडे विशेष राजकीय कौशल्य आणि राजकीय समज असल्याची खात्री वरिष्ठ नेत्यांना पटली.
नवीन अध्यक्ष विचारविनिमय करून वरिष्ठ नेत्यांनी नाव ठरवलं असलं, तरी पक्षाच्या घटनेनुसार संपूर्ण लोकशाही प्रक्रिया पूर्ण करूनच भारतीय जनता पक्षाचे बारावे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली. १४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हांच पक्षाच्या अध्यक्षपदीही तेच येतील, असा अंदाज होता. अंदाजच; कारण राजकारणात प्रत्येक गोष्टीत हजार शक्यता असतात. इथे ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची झुंबड, बंडखोरी असे सारे प्रकार तुंबळ होताना जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड बिनबोभाट बिनविरोध होते, ही साधी गोष्ट नाही. पक्षातल्या या सर्वोच्च पदासाठी काही कमी इच्छुक नसतील. अनेकांनी त्यासाठी लॉबिंगही केलं असेल. पण, त्याची कुठेही चर्चा झाली नाही. वरिष्ठ नेत्यांनी विचारविनिमय करून सहमतीने एखादं नाव ठरवलं, की त्यानंतर नाराजी, असमाधानाची कुठे एक ओळही नाही. आजच्या काळात हे किती अवघड आहे, याची कल्पना आपणां सगळ्यांनाच आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पक्षात किती धाक आहे, पक्ष संघटनेवर त्यांची किती मजबूत पकड आहे, हेच या सगळ्या निवड प्रक्रियेतून स्पष्ट होतं. अन्य पक्षांनी यावरून बरंच काही शिकण्यासारखं आहे. नवीन यांच्या निवडीवेळी, मंगळवारी सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि संपूर्ण कार्यकारिणीने हजर राहण्यालाही प्रतिकात्मक का होईना, पण मोठा अर्थ आहे. नवीन यांचं नांव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गौरवार्थ बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि नितीन नवीन हे माझे बॉस आहेत!' हे केलेलं वक्तव्य त्या पक्षात पक्ष संघटनेला असलेलं महत्त्व अधोरेखित करतं. यामुळे तरुणांना पक्ष संघटनेत काम करण्यास उत्साह मिळतो आणि जे पदाधिकारी आहेत, त्यांनाही समाधान मिळतं. पक्ष संघटनेचं बळ अशा एका वाक्यानेही वाढत असतं. हेच भाजपचं इतर पक्षांपेक्षा वेगळेपण आहे.
नितीन नवीन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असणार, हे सगळ्यांसाठी स्पष्ट असलं तरी त्यांच्या समर्थनार्थ एकूण ३७ वेगवेगळ्या गटांकडून समर्थनपत्रं दिली गेली होती. त्यातल्या एका समर्थनपत्रावर तर खुद्द पंतप्रधान मोदी आणि संसदीय पक्षाच्या सदस्यांच्या सह्या होत्या. नितीन हे भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष असले, तरी राजकारणात नवखे नाहीत. त्यांचे वडील, किशोरप्रसाद सिन्हा हे भाजपचे बिहारमधल्या बांकीपूर मतदारसंघात आमदार होते. त्याच्या निधनानंतर २००६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी नितीन पहिल्यांदा त्याच मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर सलग पाच निवडणुका त्यांनी जिंकल्या. लहान वयात त्यांनी अखिल भारतीय परिषदेचे काम केले. भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि पक्षाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०२५च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना नितीशकुमार सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं. सार्वजनिक बांधकाम विभागासारखं महत्त्वाचं खातंही मिळालं. वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी थेट पक्षाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नांवाचा विचार होण्याला ही सगळी पार्श्वभूमी कारण आहेच; पण, खरं कारण ठरलं, त्यांनी २०२३ मध्ये झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत केलेलं काम. काँग्रेसचा हा बालेकिल्ला भेदण्यासाठी त्यांच्यावर सह प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी निभावताना त्यांनी केलेली कामगिरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत भरली. सगळेजण तिथे काँग्रेसचंच सरकार येणार, असं म्हणत असल्याने मतदानोत्तर चाचण्यांनीही तोच निकाल लावला! नितीन यांनी भाजपच्या विजयाचा केवळ दावाच केला नाही, तर निकालाचा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यानंतर देशात झालेल्या निवडणुकीवेळीही त्यांचा अंदाज अचूक ठरला, तेव्हाच या तरुणाकडे विशेष राजकीय कौशल्य आणि राजकीय समज असल्याची खात्री वरिष्ठ नेत्यांना पटली. भाजपच्या अध्यक्षपदासाठी काही कमी नांवं नव्हती. १४ कोटी सदस्य असलेल्या या पक्षात प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांची रांग आहे. १९८० मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर तीन वेळा लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जन कृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, दोन वेळा राजनाथसिंह, त्यानंतर नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्यासारख्या दिग्गजांनी जे पद भूषवलं, त्या पदासाठी एवढ्या मोठ्या पक्षातून सर्वाधिक लायक व्यक्तीचीच निवड होणार. नितीन यांनी वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी हा विश्वास संपादन केला ही त्यांच्यासाठी आणि लायक कार्यकर्त्याला योग्यवेळी संधी दिली पाहिजे, हा पक्षाने केलेला विचार या दोन्ही गोष्टी संपूर्ण देशातील तरुण राजकीय कार्यकर्त्यांना मोहित करणाऱ्या ठरतील, यात वाद नाही.
नितीन यांची निवड अगदी सहज सुखरूप झाली असली, तरी त्यांच्यासमोर आव्हानंच नाहीत, असं नाही. त्यांना 'युवा' संबोधलं गेल्याने त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं, त्याचवेळी अगदी तरुण कार्यकर्त्यांत जोश भरण्याचं काम वेगवेगळ्या कल्पक कार्यक्रमांद्वारे त्यांना करावं लागेल. नवीन याची निवड हे पक्षात नव्या पिढीचा उदय मानला जातो. त्यामुळे, पक्षाच्या वाढीला गेल्या दशकभरात मिळालेला वेग त्यांना कायम ठेवावा लागेल. कर्नाटकात पक्ष सत्तेवर येऊन गेला असला, तरी तेलंगण, तामिळनाडू आणि केरळ या दक्षिणेच्या राज्यात पक्षाला अजून सत्ता हस्तगत करता आलेली नाही. तेलंगणात लोकसभा निवडणुकीत दहापैकी आठ जागा जिंकूनही विधानसभा निवडणुकीत पक्षाला तशी कामगिरी करता आली नव्हती. महाराष्ट्र निर्विवाद काबीज केल्यानंतर आता नवीन यांच्यासमोर दक्षिण प्रवेशाची उद्दिष्ट ठेवलं जाईल. त्यासाठी कर्नाटकातले पक्षातील वाद मिटवण्यापासून सुरुवात करावी लागेल. दोन डझन राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षासाठी हा 'बिहारी बाबू' दक्षिण दिग्विजयाची तयारी कशी करतो, यावर त्याच्या कारकिर्दीचं यश ठरेल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!