मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात नाहूर ते ऐरोलीदरम्यान अत्याधुनिक उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार असून यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून १२९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नाहूर–ऐरोली दरम्यान सुमारे १.३३ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. हा पूल थेट ऐरोली उड्डाणपुलाशी जोडला जाणार असून त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील प्रमुख मार्गांवरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील जंक्शन परिसरातील सततची कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
केबल-स्टेड रचनेत उभारला जाणार पूल
या उड्डाणपुलाची रचना केबल-स्टेड पद्धतीने करण्यात येणार असून, हा पूल दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली जोडणारा मुख्य उड्डाणपूल उभारला जाईल. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा हा पूल वाहतूकीत मोठा बदल घडणार आहे.
चार दिशांना थेट जोडणारे इंटरचेंज
दुसऱ्या टप्प्यात चार प्रमुख इंटरचेंज उभारले जाणार आहेत. यामध्ये नाहूर–ठाणे, ठाणे–ऐरोली, मुंबई–ऐरोली आणि मुंबईकडून ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गांचा समावेश आहे. या इंटरचेंजमुळे सिग्नलविना वाहतूक शक्य होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे.
प्रवासाचा वेळ तासावरून मिनिटांवर
१२.२ किलोमीटर लांबीचा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्ग थेट पूर्व द्रुतगती मार्गाशी जोडला जाणार आहे. सध्या साधारण ७५ मिनिटे लागणारा हा प्रवास केवळ 25 मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पूर्व–पश्चिम मुंबईमधील दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
१४ हजार कोटींचा महाप्रकल्प
संपूर्ण गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा असून यात उड्डाणपूल, जुळे बोगदे, अंडरपास आणि क्लोव्हरलीफ इंटरचेंजचा समावेश आहे. दिंडोशी न्यायालयाजवळील उड्डाणपूल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारे बोगदे आणि मुलुंड परिसरातील मोठे इंटरचेंज या प्रकल्पाचे प्रमुख टप्पे आहेत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईला पूर्व–पश्चिम दिशेने मजबूत आणि जलद जोडणी मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






