दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
“जीवनातील कठीण परिस्थितीतूनच खरे नायक घडतात,” असे म्हटले जाते. राजस्थानच्या ग्रामीण भागातील नौरोती देवी हिच्या आयुष्यात हे वाक्य अक्षरशः खरे ठरते. ऐतिहासिकदृष्ट्या महिलांना मर्यादित वाव असलेल्या समाजात जन्म घेऊनही, तिने अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस दाखवले. स्वतःसह अनेक उपेक्षितांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. एकेकाळी दगड फोडून ४ रुपये मजूरी कमावणारी नौरोती देवी संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्ती बनली आहे. राजस्थानमधील किशनगड जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात नौरोती देवीचा जन्म झाला.
अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या घरातून ती बऱ्यापैकी गरीबी असलेल्या लग्नानंतर घरात नांदायला आली. पोटापाण्यासाठी नौरोती दगड फोडण्याचं काम करत होती. कष्टाचे काम करूनही तिला आणि इतर महिला कामगारांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जात होते. पुरुषांना रोज ७ रुपये, तर महिलांना केवळ ४ रुपये वेतन मिळत होते. ‘उच्च वेतन दराच्या मानकांनुसार काम होत नाही’ या कारणाखाली हा भेदभाव केला जात होता. हा सरळ सरळ अन्याय होता. या अन्यायाने नौरोती देवी शांत बसली नाही. तिने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. महिला कामगारांना एकत्र केले आणि न्यायासाठी संघर्ष सुरू केला.
या लढ्याची दखल एका स्वयंसेवी संस्थेने घेतली. त्यांच्या मदतीने नौरोती देवीने हा प्रश्न न्यायालयात नेला. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत ती लढली. अखेर तिच्या संघर्षाचा विजय झाला. नौरोती आणि तिच्या महिला कामगारांना न्याय मिळाला. हा विजय नौरोती देवीसाठी एक नैतिक आणि ऐतिहासिक विजय ठरला. या संघर्षाने तिला उपेक्षितांच्या सक्षमीकरणासाठी अधिक बळ दिले. दगडफोड कामगार असलेल्या नौरोती देवीला गावकऱ्यांनी गावाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. पुढे ती हरमाडा ग्रामपंचायतीची सरपंच बनली. सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत अढळ धैर्य आणि प्रामाणिकपणाने तिने नेतृत्वाची भूमिका स्वीकारली.
सरपंच झाल्यानंतर सर्वप्रथम तिने स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बंकर रॉय यांनी स्थापन केलेल्या तिलोनिया येथील बेअरफूट महाविद्यालयामध्ये तिने सहा महिन्यांचा साक्षरता कार्यक्रम पूर्ण केला. हरमाडापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या महाविद्यालयात ती नियमितपणे जायची. अभ्यासूवृत्ती असल्यामुळे तिने अभ्यासक्रम लवकर पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण होताच त्याच महाविद्यालयात तिने काम करण्यास सुरुवात केली. याच काळात तिने संगणक वापरण्याचे कौशल्य आत्मसात केले.
सरपंच म्हणून तिने ग्रामीण राजस्थानमधील सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा उभारला. पंचायत सचिवांना संगणक वापरण्याचे प्रशिक्षण दिले आणि प्रशासनात पारदर्शकता आणली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी जलकुंभ, हातपंप, शौचालये आणि घरे उभारण्याचे अनेक उपक्रम तिने आपल्या कार्यकाळात राबवले.
दारू माफियांविरुद्ध आवाज उठवून नौरोती देवीने केवळ आपल्या गावातच नव्हे तर शेजारच्या गावांमध्ये देखील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुधारल्या. आपल्या कार्यकाळाच्या अखेरीस, ग्रामपंचायतीच्या तिजोरीत १३ लाख रुपयांची शिल्लक ठेवून तिने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
शिक्षणानंतर तिने महिला सक्षमीकरणासाठी “साथीन” म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गावोगावी जाऊन महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, स्वतःची संघर्षकथा सांगून प्रेरणा देणे हे तिचे मुख्य कार्य ठरले. ज्यांना कधीच शाळेचे तोंड पाहता आले नाही अशा महिलांना रोजगार कौशल्ये, गणित आणि हिंदी भाषा शिकवण्याचे महत्वाचे कार्य देखील तिने केले. नौरोती देवी “मजदूर किसान शक्ती संघटना” या तळागाळातील सामाजिक चळवळीच्या सक्रिय सदस्य आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी आणि माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तिने १९८१ पासून चाललेल्या राजस्थानमधील आंदोलनात सहभाग घेतला. या लढ्याचे फलित म्हणजे २००५ मध्ये देशभर लागू झालेला माहिती अधिकार कायदा होय.
नौरोतीची प्रेरणादायी कहाणी भारताबाहेरही पोहोचली. महिला सक्षमीकरण आणि संघर्षाचा अनुभव सांगण्यासाठी तिने चीन, जर्मनी आणि अमेरिकेचा दौरा केला. आजही ती नियमितपणे हिंदी वर्तमानपत्रे वाचते, संगणकावर काम करते आणि समाजातील घडामोडींवर सुद्धा लक्ष ठेवते.
पुढच्या आठवड्यात आपला देश प्रजासत्ताक दिन साजरा करेल. नौरोती देवीसारख्या महिला सर्वार्थाने प्रजासत्ताक भारताचे फलित आहे. या महिलांनी हा देश लोकशाहीदृष्ट्या समृद्ध केला आहे. नौरोती देवीसारख्या महिलांनी प्रजासत्ताक शब्दाला परिपूर्ण केले आहे.