आवाज हरपण्याचे दिवस संपले

डॉ. कणव कुमार


भारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. या कर्करोगांमध्ये तोंड, घसा (आवाजपेटी), थायरॉईड, सायनस, नाक तसेच लाळग्रंथी यांचा समावेश होतो. यापैकी आवाजपेटीचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक वर्षे या कर्करोगावर संपूर्ण आवाजपेटी काढून टाकणे (टोटल लॅरिंजेक्टॉमी) हा सर्वोत्तम उपचार मानला जात होता. जरी यामुळे कर्करोग बरा होण्याचे प्रमाण चांगले होते, तरी रुग्णाचा आवाज कायमचा हरपायचा. मात्र आजच्या प्रगत तपासणी आणि उपचारांमुळे बहुतेक रुग्णांमध्ये आवाजपेटी जपण्यावर भर दिला जातो.


धूम्रपान आणि मद्यपान ही आवाजपेटीच्या कर्करोगाची दोन प्रमुख कारणे आहेत. हा कर्करोग प्रामुख्याने ५० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये अधिक आढळतो. सततचा घसा बसणे किंवा आवाजात बदल होणे हे याचे सुरुवातीचे आणि महत्त्वाचे लक्षण आहे.


कर्करोग लवकर ओळखला गेला तर ट्रान्सओरल लेझर मायक्रोसर्जरी (टीएलएम) या आधुनिक पद्धतीने उपचार करता येतात. लेझरच्या साहाय्याने आवाजपेटीतील लहान गाठी काढल्या जातात. या उपचारामुळे सुमारे ९० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, आवाज व गिळण्याची क्षमता टिकून राहते, खर्च तुलनेने कमी असतो आणि बहुतेक वेळा हा उपचार डे-केअर पद्धतीने केला जातो.


मध्यम टप्प्यातील कर्करोगात रेडिएशन थेरपीसोबत केमोथेरपी दिली जाते. या उपचारपद्धतीमुळे अवयव जपण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचा नैसर्गिक आवाज कायम राहतो.
प्रगत अवस्थेतील रुग्णांना अजूनही संपूर्ण आवाजपेटी काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र आजच्या घडीला आवाज पुनर्वसनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. व्हॉइस प्रोस्थेसिस, इलेक्ट्रॉनिक लॅरिंक्स किंवा अन्ननलिकेच्या सहाय्याने बोलण्याचे प्रशिक्षण. यामुळे अशा रुग्णांनाही पुन्हा संवाद साधता येतो.


आधुनिक उपचार आणि समर्पित पुनर्वसनामुळे कर्करोगामुळे आवाज गमावणे आता अटळ राहिलेले नाही. आज बहुतेक रुग्ण आपला नैसर्गिक आवाज जपू शकतात आणि ज्यांना मोठी शस्त्रक्रिया करावी लागते, तेही योग्य प्रशिक्षणामुळे पुन्हा बोलू शकतात. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांमुळे प्रत्येक रुग्णाला केवळ आपला आवाजच नव्हे, तर आत्मविश्वास आणि जीवनाचा दर्जाही पुन्हा मिळवण्याची संधी मिळू शकते.
- सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, हेड अॅण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

Comments
Add Comment

स्पर्शाची दुनिया सारी

माेरपीस : पूजा काळे स्पर्श म्हणजे जाणीव जागृतींचा काही वेळेसाठी घडलेला सहवास. कळत नकळत होणारा हाताचा हाताशी

संघर्षातून नेतृत्वाकडे नौरोती देवीची प्रेरणादायी कहाणी

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे “जीवनातील कठीण परिस्थितीतूनच खरे नायक घडतात,” असे म्हटले जाते. राजस्थानच्या ग्रामीण

नकोशा होताहेत हव्याशा

पुरुष आणि महिला ही जीवनाच्या वाहनाची दोन चाके आहेत. एका वाहनाला सुरळीत चालण्यासाठी फक्त दोन चाकेच आवश्यक नसतात,

गोड बोलण्याचे सामर्थ्य

निशा वर्तक तीळगूळ घ्या, गोड बोला’ ही केवळ एक म्हण नाही; तो आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, जीवनाला दिलेला एक प्रेमळ

कुंकवाचं लेणं

माेरपीस : पूजा काळे लग्नसराईत नटण्याची हळदीला कोण घाई कुंकुमतिलकाने सौभाग्य वाणाची लयलूट होई. कुमारिका,

आभाची ‘अँट मॅस्कॉट’ यशोगाथा

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे ऑफीससाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीत येणाऱ्या अडचणींवरील एका साध्या चर्चेतून