‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक नांदेडमध्ये दाखल होणार असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘ट्रेन ऑन डिमांड’ योजनेअंतर्गत दिल्ली (हजरत निजामुद्दीन), चंदीगड आणि मुंबई येथून नांदेडसाठी विशेष सुपरफास्ट गाड्या चालवण्यात येणार आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) ही विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रवाना होईल. ही गाडी पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बीना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी सायंकाळी नांदेडला पोहोचेल. चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) ही विशेष गाडी देखील २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५.४० वाजता चंदीगडहून सुटेल. अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, झांसी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि पूर्णा मार्गे प्रवास करत ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी नांदेडला पोहोचणार आहे.
याशिवाय मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड दरम्यान (गाडी क्र. ०१०४१/०१०४२) विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी येथे थांबेल. परतीच्या प्रवासासाठी २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री नांदेडहून गाडी रवाना होईल. या विशेष रेल्वे गाड्यांमुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.