Wednesday, January 21, 2026

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये आता पुढील सत्तास्थापनेची गणिते आखली जात असून, विशेषतः महापौरपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. पक्षांतर्गत पातळीवर हालचाली वाढल्या असून, वरिष्ठ नेत्यांपर्यंत थेट संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक महापालिकेत भाजपने मोठे यश मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे शहराचा पुढील महापौर भाजपकडूनच निवडला जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, अनेक इच्छुक नेते मैदानात असल्याने अंतिम नाव जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्यामुळे महापौरपदाला प्रशासकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात शहर विकास, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि सुविधा याबाबत महापालिकेची जबाबदारी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या पदासाठी अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्वाची निवड होणे आवश्यक असल्याचे मत पक्षातील वरिष्ठ पातळीवर व्यक्त केले जात आहे.

निवडणूक निकालांच्या संख्याबळानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, इतर पक्ष तुलनेने कमी जागांवर मर्यादित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला महापौरपदासह महत्त्वाच्या समित्यांवर वर्चस्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापौरपदाच्या शर्यतीत सध्या तीन नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे. भाजपकडून पाचव्यांदा विजयी झालेले ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे हे अनुभवी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात. याआधी त्यांनी तीन वेळा शिवसेना आणि एकदा भाजपकडून निवडणूक जिंकली आहे. तसेच सुप्रिया खोडे आणि माजी आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप हेही दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांच्या नावालाही महत्त्व दिले जात आहे.

दरम्यान, महापौरपदासाठी लागू होणाऱ्या आरक्षणाबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असून, त्यानंतरच अंतिम समीकरण स्पष्ट होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाची कोअर कमिटी महापौरपदाचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकच्या सत्तास्थानावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >