मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन जुना बेलासिस पूल धोकादायक घोषित करण्यात आले होते त्यांनंतर त्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले, तर १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. निविदेनुसार पुलाच्या कामासाठी अजून चार महिन्यांची मुदत शिल्लक असतानाच हे काम वेळेआधी पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेचा पूल विभाग आणि मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन करत कामाची विभागणी केली. रेल्वे रुळावरील कामे मध्य रेल्वेने पूर्ण केली, तर गर्डरचे मजबुतीकरण, स्लॅब कास्टिंग, पुलाचा पृष्ठभाग आणि पोहोच मार्गाची कामे महापालिकेने पार पाडली.
या प्रकल्पादरम्यान बेस्ट वाहिन्यांचे स्थलांतर, अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पुनर्वसन, एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत हटवणे तसेच उच्च न्यायालयातील खटल्यासारखी आव्हाने समोर आली. मात्र, सर्व अडचणींवर मात करत कामात कोणताही विलंब होऊ दिला गेला नाही, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.