Wednesday, January 21, 2026

Mumbai : चेंबूरमध्ये एलपीजी गॅस टँकर थेट रेल्वे रुळावर उलटला अन्...परिसरात खळबळ

Mumbai : चेंबूरमध्ये एलपीजी गॅस टँकर थेट रेल्वे रुळावर उलटला अन्...परिसरात खळबळ

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एका एलपीजी (LPG) गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. बी. डी. पाटील मार्गावरील सर्विस रोडवरून जात असताना हा टँकर अचानक अनियंत्रित होऊन थेट रेल्वे रुळावर कोसळला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, टँकरमधून वायू गळती सुरू झाल्याच्या संशयामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी चेंबूरच्या बी. डी. पाटील मार्गावरून हा गॅस टँकर जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावरून खाली घसरून रेल्वे रुळावर जाऊन उलटला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तो रूळ मालवाहू रेल्वेच्या वाहतुकीसाठी वापरला जातो. अचानक रेल्वे मार्गावरच टँकर उलटल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. टँकर उलटल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात गॅसचा उग्र वास पसरला. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, टँकरमधून वायू गळती होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे चेंबूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना घटनास्थळापासून लांब राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणा आणि अग्निशमन दल सतर्क

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वायू गळती रोखण्यासाठी आणि टँकर रेल्वे रुळावरून बाजूला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे फवारे मारून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. टँकर नेमका कशामुळे उलटला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >