Wednesday, January 21, 2026

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी

मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही आरक्षण सोडत नगरसेवक प्रभागाच्या आरक्षणानुसार नव्याने न काढता चक्राकार पध्दतीने काढली जाण्याची शक्यता माध्यमाद्वारे वर्तवली जात आहे. मात्र, चक्राकार पद्धतीने या पदाची आरक्षण सोडत काढली गेल्यास सर्वसाधारण खुर्ला प्रवर्ग वगळता उर्वरीत सर्व प्रवर्गातील एखादे आरक्षण निघू शकते अशाप्रकारची शक्यता आहे. मागील महापौर पदासाठी खुला प्रवर्ग आणि एस सी महिला यासाठीचे आरक्षण निघालेले असल्याने या चक्राकार पद्धतीने एस सी व ओबीसीचे आरक्षण पडले जाण्याची दाट शक्यता आहे.

पालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिध्द झाली. त्यानुसार काँग्रेस पक्षाच्यावतीने नगसेवकांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे पूर्ण झाली आहे. आता भाजप, शिवसेना आणि अन्य पक्षांमधील निवडून आलेल्या नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

महापौरपदी कोण बसणार याची चर्चा सुरू असली तरी यासाठी कोणत्या आरक्षण प्रवर्गातील महापौर असेल हे निश्चित होणे आवश्यक आहे. त्यानुसार गुरुवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. हे आरक्षण नव्याने न काढता जुन्याच आरक्षणाचा विचार करता चक्राकार पद्धतीने काढले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आतापर्यंत महापौरपदाचे असे होते आरक्षित प्रवर्ग

  • सन २००० : सर्वसाधारण ( हरेश्वर पाटील)
  • सन२००२ : एस सी (महादेव देवळे)
  • सन २००५ : सर्वसाधारण (दत्ताजी दळवी)
  • सन २००७ : ओबीसी महिला (डॉ. शुभा राऊळ)
  • सन २००९ : सर्वसाधारण महिला (श्रद्धा जाधव)
  • सन २०१२ : सर्वसाधारण (सुनील प्रभू)
  • सन २०१४ : एस सी महिला (स्नेहल आंबेकर)
  • सन २०१७ : सर्वसाधारण (प्रि विश्वनाथ महाडेश्वर)
  • सन २०२० : सर्वसाधारण (किशोरी पेडणेकर)

कशी असते चक्राकार पद्धती : महापौरपदासाठी मागील आरक्षण वगळून अन्य प्रवर्गाचे आरक्षण सोडतीसाठी चिठ्ठी टाकली जाते. त्यामुळे जर मागील महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील असेल पुढील आरक्षण सोडत काढताना या प्रवर्गाचा विचार केला जात नाही. त्या प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील आरक्षण चिठ्ठ्या लॉटरी सोडतीसाठी टाकल्या जातात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >