Wednesday, January 21, 2026

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

मुंबई :  छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला, निमित्त होते…‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचे. शिववंदना, शिवशाहिरांकडून सादर झालेल्या दमदार पोवाडा सादरीकरणाने हा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला.

मराठी चित्रपटाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत.‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासात दडलेले सुपरहिरोज AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. या ट्रेलर अनावरण प्रसंगी महाराजांचा ‘तिसरा डोळा’ अशी ख्याती असणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेच्या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या निमित्तानं झालेला हा प्रयत्न जो मराठी सिनेसृष्टीसोबतच शिवप्रेमी रसिकांसाठीसुद्धा अभिमानास्पद आहे. हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं विविध भाषेत अवघ्या काही सेकंदात देते.

औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहा, सर्वत्र कडेकोट पहारा आणि आजूबाजूला निराशेचा अंधार अशा मोठ्या बिकट अवस्थेत शिवाजी महाराजांची आग्रा भेट झाली होती. माणसांची उत्तम पारख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणाऱ्या महाराजांनी या सगळ्या गोष्टी कशा हाताळल्या आणि ही स्वारी कशी यशस्वी केली याची झलक या ट्रेलर मध्ये पहायला मिळते आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ३० जानेवारीला प्रेक्षक भेटीला येणार आहे.

‘शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला. शिवकाळातलं एक सुंदर आणि तेजस्वी पान उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला असून हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांची मेहनत लक्षात येईलच. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी नक्की होईल अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली. चित्रपटाविषयीचे अनुभव आणि आपल्या भूमिकेचे नानाविध पैलू चित्रपटातील कलाकारांनी याप्रसंगी उलगडले.

‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Comments
Add Comment