Wednesday, January 21, 2026

कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिकेतील बहुमतासाठी सुरू असलेल्या हालचालींमध्ये आता नवे समीकरण चर्चेत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून साथ मिळू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मनसेचे पाच नगरसेवक नवी मुंबईतील कोकण भवन येथे दाखल झाल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व आलं आहे. या भेटीत मनसेचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित असल्यामुळे सत्तास्थापनेबाबत गुप्त चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी आले आहेत की सत्तेच्या गणितासाठी, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ६२ हा आकडा महत्त्वाचा मानला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे ५३, भाजपचे ५०, ठाकरे गटाचे ११ आणि मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र ठाकरे गटातील काही नगरसेवक गट नोंदणीवेळी अनुपस्थित राहिल्याने फूट पडल्याची चर्चा सुरू झाली.

या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे संख्याबळ घटून ७ वर आल्याच्या चर्चा सुरु आहेत. उर्वरित काही नगरसेवक मनसेच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, हे सर्व मिळून शिंदे गटाला पाठिंबा देऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील सत्तासंघर्षात पुढील काही तास निर्णायक ठरण्याची शक्यता असून, मनसे नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >