मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावा. जेट्टीच्या कामात २५ फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिले.
रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले, मुख्य बंदरे अधिकारी खराह आदी उपस्थित होते.
रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात २५ फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.
रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईल, असेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.