Tuesday, January 20, 2026

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग

नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. तमिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले जावे, ही राज्यपालांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

विधानसभेच्या सत्राची सुरुवात परंपरेनुसार तमिळ गीताने झाली. राज्यपालांनी आग्रही मागणी केली की तमिळ गीतासोबतच राष्ट्रगीतही वाजवले गेले पाहिजे. या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष अप्पावू व राज्यपाल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, संतापलेल्या राज्यपालांनी अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय घेतला.

सभागृहाबाहेर पडल्यानंतर राज्यपालांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली. ‘राष्ट्रगीताला योग्य सन्मान दिला जात नाही, याचे मला दुःख वाटते. माझ्या अभिभाषणात वारंवार अडथळे आणले गेले. मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, पण राष्ट्रगीताचा सन्मान हा असायला हवा,’ असे आर. एन. रवी यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, ‘बोलताना माझा माईक बंद करून माझा अपमान करण्यात आला,’ असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

सलग तिसऱ्या वर्षी बहिष्कार

आर. एन. रवी यांनी तामिळनाडू विधानसभेच्या सत्रावर बहिष्कार टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०२४ आणि २०२५ मध्येही त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांशी असहमती दर्शवत अभिभाषण देण्याचे टाळले होते. राजभवनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सरकारवर असहकार्याचा आरोप करण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षांचे प्रत्युत्तर

राज्यपालांच्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष अप्पावू यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले. ‘विधानसभेत केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांचे विचार मांडण्याची मुभा असते. कोणीही आपल्या अटी सभागृहावर लादू शकत नाही. सरकारने राज्यपालांच्या भाषणाची सर्व तयारी केली होती, पण त्यांनी स्वतःच नकार दिला,’ असे अध्यक्षांनी ठणकावून सांगितले.

Comments
Add Comment