Wednesday, January 21, 2026

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उपचारांचा खर्च टाळण्यासाठी दोन मित्रांनीच आपल्या मित्राचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विनोद कुमार (वय २६), रहिवासी कल्याणपूर, हा नववर्षाच्या दिवशी आपल्या दोन मित्रांसोबत पार्टी करत होता. मद्यपान सुरू असताना नारळ पाणी आणण्याच्या बहाण्याने त्याला झाडावर चढण्यास भाग पाडण्यात आलं. या दरम्यान तोल गेल्याने तो खाली पडला आणि त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली.

जखम गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर उपचारासाठी मोठा खर्च येईल या भीतीने दोघांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं. विनोदला मदतीसाठी रुग्णालयात नेण्याऐवजी, घरी सोडतो असं सांगून रस्त्यातच तलावाजवळ नेण्यात आलं. तेथे त्याला पाण्यात ढकलून ठार करण्यात आलं.

घटनेनंतर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी नेहमीप्रमाणे वावर केल्याचं पोलिसांनी सांगितलं. काही वेळानंतर ते पुन्हा घटनास्थळी गेले आणि मृतदेह बाहेर काढून दगड बांधत तो विहिरीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

विनोद बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे केल्यानंतर तपासाला वेग आला. मोबाईल लोकेशन आणि चौकशीतून आरोपींची भूमिका स्पष्ट झाली. पोलिसांनी सुदीप आणि प्रज्वल या दोघांना अटक केली असून, या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Comments
Add Comment