Wednesday, January 21, 2026

जिल्ह्यात सुगंधी, आकर्षक जांभळी मंजिरी बहरली

जिल्ह्यात सुगंधी, आकर्षक जांभळी मंजिरी बहरली

निसर्गाचा सुगंधी आविष्कार; अभ्यासक व निसर्गप्रेमी सुखावले

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य शेतांमध्ये जांभळी मंजिरीची सुगंधी व आकर्षक फुले बहरली. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक व निसर्गप्रेमींची रेलचेल पहायला मिळत असून, अनेकांना तर हा निसर्गाचा सुगंधी चमत्कार वाटत आहे.

जांभळी मंजिरी ही पाण वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव `पोगोस्टेमॉन डेक्क्नेनसिस’असे आहे. कास पठारावर ही मुबलक प्रमाणात आढळते; परंतु फुलोरा मात्र सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात येतो, तर कोकणात आढळणारी जांभळी मंजिरी भात कापणी झाल्यावर रुजून येते व फुलोरा मात्र नोंव्हेबर व डिसेंबर असा येतो. हा बदल अधिवास वेगळा असल्याने होतो. जिल्ह्यातही सड्यावर होणारी मंजिरी लवकर फुलते असे जिल्ह्यातील प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले. संपूर्ण शेत किंवा शेताचा काही भागहर फुलेली ही मनमोहक फुले पाहून जणुकाही जांभळ्या रंगाची झालरच पांघरली आहे असे वाटते. आजूबाजूच्या परिसरातही मंजिरीचा सुवास दरवळत असतो. परिणामी ही मनमोहक व आकर्षक फुले अनेकांचे लक्ष वेधून घेतात. येथून जाणारे अनेक प्रवासी व वाटसरू मंजिरीची ही जांभळी झालर पाहण्यासाठी आवर्जून थांबतात. काहीजण तर येथे नियमित देखील येतात. जांभळ्या मंजिरीचा हा अद्भुत नजारा काही दिवसच पहायला मिळतो फेब्रुवारीनंतर हवामानात बदल होऊ लागला की, ही फुले व झुडपे सुकून जातात आणि पुढीलवर्षी पावसाळा सरल्यावर व हिवाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा जांभळी मंजिरी बहरते. बुटकी आणि झुडुपवजा असलेल्या या झाडांची पाने हिरव्या रंगाची असतात. यांना आकर्षक रंगाची जांभळी फुले तुऱ्यांप्रमाणे येतात. सकाळी धुक्याचे दवबिंदू या फुलांवर पडल्यावर ते अधिकच आकर्षक व खुलून दिसतात.

जांभळ्या मंजिरीची झाडे सुगंधी द्रव्याने युक्त असतात. त्यामुळे यापासून वेगवेगळी सुगंधी तेल काढली जातात, तसेच सुगंधी द्रव्य बनविण्यासाठी देखील वापरले जाते. जिल्ह्यात जांभळी मंजिरीचे प्रमाण जास्त जाणवू लागले आहे. त्यांची दोन तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे ती पूर्वीपासून आहेच, पण कासपठार प्रसिद्ध झाल्यापासून अनेकजण तिला आवर्जून बघायला लागले, तसेच दुसरे कारण म्हणजे जिल्ह्यात शेती करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत पूर्वी बहुतांश शेतकरी भातपीक घेतल्यानंतर दुबार पीक म्हणून वाल, हरभरा, चवळी किवा मुग वगैरेसारखी पिके घ्यायचे. त्यासाठी पुन्हा नांगरट करावी लागायची. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मंजिरी नष्ट व्हायची. मात्र अलिकडे पडिक शेतीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे मंजिरीचे क्षेत्र वाढत असल्याचे निसर्ग अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले.

हा निसर्गाचा एक मनमोहक आविष्कार आहे. ठरावीक कालावधीतच आणि विशिष्ट शेतांमध्येच जांभळी मंजिरी फुललेली दिसते. पर्यावरणाच्या साखळीमध्ये तिचेही काही योगदान आहे. जांभळ्या मंजिरीच्या प्रजातीचे संरक्षण होणे आवश्यक आहे. या हंगामात हमखास ही फुले पाहण्यासाठी या ठिकाणी येतो. शाळकरी मुलांनी देखील अशा ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे. - अमित निंबाळकर (कृषी व वनस्पती अभ्यासक)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा