Wednesday, January 21, 2026

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर महायुतीच्या दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी म्यान करत एकत्र सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे या तिन्ही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष मिळून महापौर बसवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

  मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत परतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीत तिन्ही महानगरपालिकांतील सत्तावाटप, महापौरपद आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबत अंतिम रूपरेषा ठरवली जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देताना, “तीनही महानगरपालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला असून, त्या जनादेशानुसारच महायुतीची सत्ता स्थापन होईल,” असे स्पष्ट केले.   ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेने १३१ पैकी ७५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी भाजपकडून अडीच वर्षांसाठी महापौरपद देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेतेपदासाठी आग्रही भूमिका घेतल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला होता. सन्मानजनक वाटा न मिळाल्यास ‘दुसऱ्या भूमिके’चा पर्याय खुला असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले होते.   दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना (५३) आणि भाजप (५०) हे दोन्ही पक्ष बहुमतापासून दूर असतानाही आपापला महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी उबाठाचे चार नगरसेवक आपल्याकडे वळवून मनसेचाही पाठिंबा मिळवला होता. तर, उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याने शिवसेना आघाडीने बहुमताचा आकडा गाठला होता. मात्र, महायुती म्हणून निवडणूक एकत्र लढवली असताना, जनादेशाचा अशाप्रकारे अपमान करणे भविष्यातील राजकारणासाठी घातक असल्याने दोन्ही पक्षांनी समन्वयातून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment