Wednesday, January 21, 2026

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू
मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ५.३ किलोमीटर लांबीच्या, तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी भूमिगत जुळ्या बोगद्यांचे बांधकाम करण्याकरिता दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. त्यापैकी एका बोगदा खनन संयंत्राचे सर्व घटक भाग उपलब्‍ध असून दुस-या बोगदा खनन संयंत्राचे उर्वरित घटक भाग गुरूवारी  २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री कार्यस्थळी दाखल हाेणार आहेत.
खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून दिनांक १० मार्च २०२६ पर्यंत बोगदा खनन संयंत्र ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जून २०२६ पासून प्रत्यक्ष बोगदा खोदकामास सुरुवात केली जाईल. जोड रस्‍ता प्रकल्पाची कामे निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्‍यात. कामाचा वेग व गुणवत्ता कायम राखावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग  प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे ५.३ किलोमीटर लांबीच्‍या, तिहेरी मार्गिका असलेल्‍या बोगद्यासाठी लॉन्चिंग शाफ्ट उत्खनन जलद गतीने सुरू आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी या कामाची प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी केली. त्‍यावेळी त्‍यांनी विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.
अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) बांगर यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील 'लॉन्चिंग शाफ्ट' चे खोदकाम सुरू असलेल्‍या कार्यस्‍थळास भेट दिली. या शाफ्टचे एकूण आकारमान अंदाजे २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. खोदकाम खोलवर सुरू असून बाजूच्‍या भिंती खचू नयेत म्‍हणून 'रॉक ऍंकरिंग' करण्‍यात आले आहे. आतापर्यंत २०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि २३ मीटर खोलीपर्यंतचे खोदकाम पूर्ण करण्‍यात आले आहे. उर्वरित ७ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण करून बोगदा खनन संयंत्र कार्यान्वित करण्‍याकामीचा साचा  बनविण्‍याची कार्यवाही विनाविलंब करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. सध्‍या दररोज खोदकामातून साधारणत: १४०० ते १५०० क्‍युबिक मीटर दगड व माती बाहेर पडत आहे. दररोज १२० वाहनांद्वारे त्‍याचे वहन केले जाते. निर्धारित कालमर्यादेत खोदकाम पूर्ण करण्‍यासाठी कामाची गती वाढवावी, असेही निर्देश  बांगर यांनी दिले आहेत.
गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा नवीन प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा होणार असून वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्त्याच्या तुलनेत या नवीन जोडरस्त्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची प्रवास वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच, कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >