मोहित सोमण: आज इटर्नल (Zomato) कंपनीच्या गोट्यातून दोन महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत आपला तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीचे सर्वेसर्वा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंदर गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा घोषित केला आहे. आर्थिक निकालातील माहितीनुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७३% यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ५९ कोटी रुपये तुलनेत यंदा १०२ कोटींवर नफा पोहोचला. तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबरपर्यंत ५४०५ कोटीवरून १६३१५ कोटींवर वाढ झाली. तर एकूण उत्पन्नात इयर ऑन इयर ५६५७ कोटी रुपये तुलनेत १६६६३ कोटींवर वाढ झाली आहे.
कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये आज दिपेंदर गोयल यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना नव्या संचालक पदावर अलबिंदर धिंडसा (Albinder Dhindsa) यांच्या नियुक्तीची माहिती यावेळी दिली.'अलीकडे, मी स्वतःला काही नवीन कल्पनांकडे आकर्षित झालेले पाहिले आहे ज्यामध्ये लक्षणीयरीत्या जास्त जोखमीचे संशोधन आणि प्रयोग समाविष्ट आहेत. या अशा प्रकारच्या कल्पना आहेत, ज्यांचा पाठपुरावा 'इटरनल'सारख्या सार्वजनिक कंपनीच्या बाहेर करणे अधिक योग्य आहे' असे गोयल यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी एक्सचेंज फायलिंगमध्ये हे देखील म्हटले आहे की,आता कामकाजाचे निर्णय धिंडसा घेणार आहेत ग्रुप सीईओ म्हणून ते दैनंदिन कामकाज, कार्यान्वयन प्राधान्यक्रम आणि व्यावसायिक निर्णयांची जबाबदारी सांभाळतील. ब्लिंकिटच्या अधिग्रहणापासून ते नफा-तोटा समतोल साधण्यापर्यंतचा प्रवास त्यांनीच सांभाळला होता आणि आता ते ग्रुप सीईओ म्हणून इटर्नलचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.
गोयल यांनी २००८ मध्ये पंकज चड्डा यांच्यासोबत झोमॅटोची एक स्टार्टअप म्हणून स्थापना केली होती. या संक्रमणाचा एक भाग म्हणून गोयल यांचे सर्व अवितरित स्टॉक पर्याय कर्मचारी स्टॉक ऑप्शन (Esop) पूलमध्ये परत जातील अशी माहिती मिळत आहे. ज्याचे सुरुवातीचे नाव फूडिबे होते. हे रेस्टॉरंटचे मेनू आणि पुनरावलोकने प्रदान करणारे एक प्लॅटफॉर्म होते जे कालांतराने आजच्या अन्न वितरण क्षेत्रातील कंपनीत परावर्तित झाले होते. गेल्या वर्षभरात, गोयल यांनी 'इटरनल'च्या बाहेर स्वतःचे अनेक डीपटेक, दीर्घायुष्य आणि वैयक्तिक संशोधन उपक्रम सुरू केले आहेत त्यांनी तशी माहिती यापूर्वी दिली होती.
ढिंडसा हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या, पूर्वी ग्रोफर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लिंकिटचे सह-संस्थापक आणि सीईओ म्हणून ओळखले जातात. पंजाबमधील पतियाळा येथे जन्मलेल्या त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, नंतर अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली, ज्यामुळे तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्समधील त्यांच्या करिअरचा पाया रचला गेला. ढिंडसा यांनी २०१३ मध्ये सौरभ कुमार यांच्यासोबत ग्रोफर्सच्या स्थापन केली होती. उद्योजक म्हणून त्यांनी सुरुवातीला स्थानिक दुकाने आणि ग्राहकांना जोडणारी एक हायपरलोकल डिलिव्हरी सेवा म्हणून सुरू झालेली ग्रोफर्स सुरू केली कालांतराने एका पूर्ण सेवा देणारी ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्ममध्ये विकसित झाली. २०२१ मध्ये, कंपनीने आपले नाव बदलून ब्लिंकिट केले आणि क्विक-कॉमर्स मॉडेलवर लक्ष केंद्रित केले ज्यामध्ये अवघ्या १० मिनिटांत किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाचे आश्वासन दिले गेले. या धोरणामुळे भारतातील वेगवान डिलिव्हरी क्षेत्रात ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये मोठे बदल झाले आता ते इटर्नलची सूत्रे हाती घेतील.
यासह तिमाहीतील अतिरिक्त माहितीनुसार, कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) १२४ कोटीवरून १७० कोटींवर वाढ झाली होती तर कंपनीच्या इतर एकत्रित उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर ३९ कोटीवरून १३० कोटींवर वाढ झाली आहे. ईपीएस (Earning per share EPS) ०.०७ रूपयांवरून ०.११ रूपयावर वाढ झाली आहे. तर तिमाही बेसिसवर (QoQ) कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात २४८५ कोटींवरून २६७६ कोटींवर वाढ झाली आहे. आज कंपनीचा शेअर बाजार बंद होताना ४.९०% उसळत २८२.३० रूपयांवर बंद झाला आहे.गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.३८% घसरण झाली असून गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये १.३६% व गेल्या एक वर्षापासून ३१.८१% वाढ झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर कंपनीचा शेअर ०.३५% घसरला आहे.






