७ नगरसेवक गट नोंदणीसाठी हजर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या निकालानंतर स्थानिक राजकीय नाट्याची मालिका सुरू झाली आहे. एकापाठोपाठ धक्के मिळत असून भाजप-शिवसेनेने महापौरपदासाठी ताकद लावली आहे. कडोंमपा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या चार दिवसांतच उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.
उबाठाच्या ११ पैकी केवळ ७ नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनात उपस्थित राहिल्याने ४ नगरसेवक फुटल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गट नोंदणीवेळी मधूर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक अनुपस्थित होते. यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आले आहे. दरम्यान, उपस्थित ७ नगरसेवकांच्या बैठकीत उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी, तर संकेश भोईर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप ५० तर एकनाथ शिंदेंची शिवसेनेला ५३ जागा मिळाल्या आहेत. तर उबाठाचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप-शिवसेना युतीमध्ये लढले असून येथे युतीची सत्ता येणार आहे. सध्या दोन्ही पक्ष महापौरपदासाठी अडून बसले आहेत. शिवसेनेसह भाजपही नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहे.
दरम्यान उबाठाने निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांना अपात्रतेच्या कारवाईचा धाक दाखवला असून काल (२० जाने.) त्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. उबाठातील नगरसेवक ‘गेमचेंजर’ ठरत असल्याचे बोलले जात आहे. गैरहजर नगरसेवकांवर पक्षाकडून कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






