नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांच्या जगात आघाडीवर असलेले 'युपीआय' (UPI) आता केवळ पैसे पाठवण्याचे साधन न राहता, सर्वसामान्यांसाठी कर्जाचे सोपे व्यासपीठ बनणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि आघाडीच्या बँकांमध्ये सुरू असलेली चर्चा यशस्वी झाल्यास, लवकरच ग्राहकांना युपीआयच्या माध्यमातून 'इन्स्टंट' कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या नवीन फिचरमुळे क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या मक्तेदारीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांना छोटे कर्ज किंवा खरेदीसाठी ४० ते ४५ दिवसांची व्याजमुल्य सवलत देतात. मात्र, मुदत संपल्यानंतर व्याजाचा दर इतका प्रचंड असतो की, चक्रवाढ व्याजामुळे ग्राहक कर्जाच्या खाईत ओढला जातो. याउलट, युपीआयवर उपलब्ध होणारे कर्ज हे अत्यंत लवचिक असेल. विशेष म्हणजे, क्रेडिट कार्डप्रमाणेच या कर्जावरही एका ठराविक मर्यादेपर्यंत शून्य व्याज आकारले जाण्याची शक्यता आहे. कर्ज वसुलीची पद्धतही ग्राहकांसाठी सुटसुटीत असल्याने ग्राहकांचा कल युपीआयकडे वाढणार आहे. सध्या काही युपीआय प्लॅटफॉर्म्स बँकांच्या सहकार्याने फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा गुंतवणुकीवर आधारित 'को-ब्रँडेड' क्रेडिट कार्ड्स देत आहेत, ज्यावर कॅशबॅकच्या सवलतीही मिळतात. मात्र, आता थेट युपीआय ॲपमध्येच कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची सुविधा मिळाल्यास ग्राहकांना वेगळे क्रेडिट कार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही.
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये आता पुढील ...
क्रेडिट कार्ड भारी की UPI क्रेडिट लाईन?
युपीआय क्रेडिट लाईन आणि क्रेडिट कार्ड यांच्यातील व्याजाच्या फरकामुळे ग्राहक आजही प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट कार्डलाच अधिक पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे. युपीआय क्रेडिट लाईन लोकप्रिय न होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे, या सुविधेचा वापर केल्यावर पहिल्याच दिवसापासून लागू होणारे व्याज. जेव्हा एखादा युझर युपीआय क्रेडिट लाईनद्वारे पेमेंट करतो, तेव्हा त्या क्षणापासूनच घेतलेल्या रक्कमेवर व्याजाची मोजणी सुरू होते. यामुळे कर्जाची रक्कम तातडीने महाग पडते, जे सर्वसामान्य ग्राहकांसाठी फायद्याचे ठरत नाही. दुसरीकडे, क्रेडिट कार्डच्या लोकप्रियतेचे गुपित त्याच्या 'इंटरेस्ट-फ्री' (व्याजमुक्त) कालावधीत दडलेले आहे. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना महिना किंवा सव्वा महिन्यापर्यंत मोफत रक्कम वापरण्याची मुभा मिळते. जर ही रक्कम मर्यादित वेळेत बँकांकडे जमा केली, तर ग्राहकाला एक रुपयाही जास्तीचा व्याज म्हणून द्यावा लागत नाही. मात्र, या मुदतीनंतर लागणारे चक्रवाढ व्याज हे अत्यंत महाग असते. तरीही, महिनाभराच्या मोफत सुविधेमुळे ग्राहक क्रेडिट कार्डकडेच अधिक आकर्षित होत आहेत. .
काय आहे नवीन प्लॅन?
NPCI च्या नवीन प्लॅननुसार युपीआय क्रेडिट लाईनमध्ये आता क्रेडिट कार्डप्रमाणेच ग्रेस पीरियड मिळेल. या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. तर ठराविक मुदतीत ही रक्कम ग्राहकाला परतफेड करावी लागेल. म्हणजे क्रेडिट कार्डप्रमाणेच या क्रेडिट लाईनचा उपयोग होईल. म्हणजे क्रेडिट लाईन आधारे ग्राहकांना बिल अथवा इतर वस्तूंसाठी खर्च करता येईल. एका मुदतीसाठी ही रक्कम वापरता येईल. त्या रक्कमेवर व्याजही द्यावे लागणार नाही आणि ही रक्कम परत करता येईल. त्यावर त्यांना वेगळे अथवा अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार नाही.
आता ४५ दिवसांपर्यंत फ्री पैसे
क्रेडिट कार्डांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी काही बँकांनी 'युपीआय क्रेडिट लाईन'वर (UPI Credit Line) व्याजमुक्त कालावधी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात ग्राहकांना खिशात क्रेडिट कार्ड न ठेवताही, ४५ दिवसांपर्यंत मोफत पैसे वापरण्याची सुविधा केवळ एका 'स्कॅन'वर उपलब्ध होणार आहे. क्रेडिट कार्डच्या 'इंटरेस्ट फ्री पीरियड'ला टक्कर देण्यासाठी यस बँकेने (Yes Bank) आपल्या युपीआय क्रेडिट लाईनवर तब्बल ४५ दिवसांपर्यंत विनाव्याज रक्कम परत करण्याची सुविधा देऊ केली आहे. पाठोपाठ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेनेही ग्राहकांसाठी ३० दिवसांचा व्याजमुक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे 'वापरल्या क्षणापासून व्याज' या युपीआय क्रेडिट लाईनच्या मोठ्या त्रुटीवर बँकांनी आता तोडगा काढण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी गुंतवणुकीच्या नव्या योजनाही आखल्या आहेत. काही बँका आता ग्राहकांना मोठी रक्कम 'मुदत ठेव' (FD) म्हणून ठेवण्यास प्रोत्साहित करत आहेत. यावर ग्राहकांना एफडीचे नियमित व्याज तर मिळेलच, शिवाय त्या मुदत ठेवीच्या जोरावर क्रेडिट कार्ड आणि त्यावर आकर्षक कॅशबॅकही दिला जात आहे. अशा 'स्मार्ट' गुंतवणुकीमुळे ग्राहकांना बचतीसोबतच खर्चासाठीही जास्तीचे फायदे मिळत आहेत. अनेक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म्स सध्या यासंदर्भात नवनवीन प्रयोग करत आहेत. जर बहुतांश बँकांनी युपीआयवर ३० ते ४५ दिवसांचा व्याजमुक्त कालावधी दिला, तर ग्राहकांना क्रेडिट कार्डची गरजच उरणार नाही. सहज सोपी प्रक्रिया, सुरक्षित व्यवहार आणि आता मोफत कालावधी यामुळे युपीआय क्रेडिट लाईन नजीकच्या भविष्यात क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या व्यवसायासमोर मोठे संकट उभे करण्याची शक्यता आहे.






