नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर सुरू होत आहे. हा सामना भारतीय क्रिकेटसाठी आणि विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच सूर्या आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० सामन्यांचा टप्पा ओलांडणारा सूर्यकुमार हा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरेल. आतापर्यंत भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा मान रोहित शर्मा (१५९ सामने), विराट कोहली (१२५ सामने) आणि हार्दिक पांड्या (१२४ सामने) यांच्याकडे आहे. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्यादेखील विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची शक्यता आहे. केवळ सामन्यांचेच शतक नव्हे, तर सूर्यकुमारला या मालिकेत षटकारांचे 'चौकार' ठोकण्याचीही मोठी संधी आहे. त्याने आतापर्यंत विविध टी-२० सामन्यांत ३९५ षटकार ठोकले आहेत. या मालिकेत त्याने आणखी ५ षटकार लगावल्यास, टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा ओलांडणारा तो रोहित शर्मा (५४७) आणि विराट कोहली (४३५) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरेल.






