Wednesday, January 21, 2026

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सरकारमधील महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला आणि त्यांचे तीन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असल्याने या तीन नगरसेवकांची मते आपल्याला मिळतील अशाप्रकारची धारणा महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेची असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्र्वादी काँग्रेस (शप) तसेच समाजवादी पक्ष येत एक स्वतंत्र गट स्थापन करत आहेत.त्यामुळे अशाप्रकारे गट केल्यास त्यांचाही एक सदस्य विविध समित्यांवर जावू शकतो आणि प्रसंगी या गटातील सदस्य परिस्थितीनुसार कुणाच्याही बाजूने मतदान करू शकतात असे चित्र बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची तसेच त्यांच्या गटांची नोंदणी प्रक्रिया सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शपचा एक आणि समाजवादी पक्षाचे दोन अशाप्रकारे सहा नगरसेवक आहेत. यासर्वांची स्वतंत्र नगरसेवक म्हणून नोंदणी न करता एक गट म्हणून तिन्ही पक्षांची नोंदणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून हालचाली सुरु आहेत. जर स्वतंत्र नगरसेवकांची नोंदणी झाल्यास या तिन्ही पक्षातील नगरसेवकांना स्वतंत्रपणे बसावे लागणार आहे तसेच त्यांना कोणत्याही समितीमध्ये स्थान मिळणार नाही. त्यातुलनेत तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी गट केल्यास महत्वाच्या समित्यांमध्ये प्रत्येक एक एक सदस्य जावू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ सईदा खान, बुशरा मलिक,आयेश शम्स खान हे तिन नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रसे (शप) पक्षाने उबाठा आणि मनसेने आघाडीमध्ये निवडणूक लढवली आहे. या पक्षाच्यावतीने अजित रावराणे हे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्षाच्यावतीने अमरीन शेहजाद अब्राहनी आणि इरम साजिद अहमद सिद्दीकी हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षाच्यावतीने गट करून प्रत्येक समित्यांमध्ये प्रत्येकी एक नगरसेवकांची वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी कांग्रेस हा सरकारमधील महायुतीतील घटक पक्ष असल्याने त्यांचे तीन नगरसेवकांसोबत भाजप तसेच शिवसेना यांची एकत्र येत गट स्थापन केला असता तरी विविध समित्यांमध्ये महायुतीचे संख्याबळ वाढू शकते. तसेच शिवसेना आणि भाजप यांचाही गट केल्यास त्यांचे संख्या बळ वाढू शकते. मात्र गट केल्यास पाच वर्षांतील बांधिलकी कायम राहणार असून एकच गट असल्याने या गटाचा प्रमुख नेता असलेल्याचा व्हिप पाळणे सर्व सदस्यांवर बंधनकारक राहणार आहे. त्यामुळेच सर्व पक्ष स्वतंत्र गट तयार करून अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून शरद पवार हे उबाठा आणि मनसेसोबत गेले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढली. परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत एकत्र येण्याची चिन्हे असून गट करत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक असल्यामुळे या पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ सईदा खान या गटनेत्या होवू शकतात,असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >