माेरपीस : पूजा काळे
स्पर्श म्हणजे जाणीव जागृतींचा काही वेळेसाठी घडलेला सहवास. कळत नकळत होणारा हाताचा हाताशी समेट, शरीराने शरीराला हलकासा दिलेला झोका त्यातून मन पाखरू पाखरू शहारत गेलेला भावनिक गुंतागुंतीचा ओझरता मखमली स्पर्श जणू काही हर्षचं. स्पर्शाला जाणीव आसक्ती जडता भौतिक सुखाच्या मोहमयी ओलाव्याची संवेदनशील छाया असं देखील म्हणता येईल. गरम, मऊ, खरखरीत, ऊबदार या भौतिक संवेदनेत स्पर्शाची सुबक व्याख्या सापडेल. नितळ त्वचेला सुखावणारी संवेदना कधी हवा, पाणी, वस्तूंच्या स्पर्शातून, तर कधी आपुलकी विश्वासाच्या समेवर भावनिक सौम्य स्पर्शाची अनुभुती देईल. सौहार्द प्रेमातून आलेली भावना सहवासायोगे मनाला आधार देत जगण्याची उभारी घेईल. नाजूक शरीराची नाजूक त्वचा स्पर्श संवेदनेचं महत्वाचं अंग असल्याने वरचेवर ते जागृत होईल. मनाला मनाची, सुखाला सुखाची, शरीराला शरीराची कायम ओढ राहील. मानवासाठी स्पर्शाचा अर्था अर्थी संबंध इथून तिथून सारखाचं असल्याने स्पर्शाच्या पहिल्याच पायरीवर असलेला मातेचा उबदार स्पर्श आठवा, जो जगातल्या सर्वोत्तम वेदनेला आश्वासक ऊब देतो. प्रसूती वेदनेनंतर ममत्व जागृती स्पर्शाने आईस पान्हा फुटतो. बाळ जन्मल्यानंतर आईचा परीस स्पर्श झऱ्यागत वाहू लागतो. लोण्यागत मऊशार कुशीतली ऊब हवीहवीशी वाटू लागते. आई म्हणजे ममत्व. आई म्हणजे जगण्याचं एकमेव ठिकाण. विश्वासाचं हक्काचं पान, अशावेळी स्पर्शाची भावना जितकी नाजूक तितकीचं ती संवेदनशील होते. भाव भावनांचे विविधांगी पदर यात अनुभवास येतात. भावनेच्या अत्युच्य अविष्काराकडे मन ओढलं जात.
आयुष्यातला दुसरा माऊली स्पर्श पंढरपूरी विठोबारायाच्या पद स्पर्शाची ओढ लावणारा, भक्तीपुरात दंग करणारा. चराचरात वसलेल्या पांडुरंगाची आस अंतरंग स्पर्शून जावी या प्रतीक्षेत भक्त असतो. ज्ञानामृताच्या स्पर्शासाठी तन मन धन सगळं विसरून जातो. त्यासमयी "सोहळा पालखीचा नयनी साठवावा, माऊली पदस्पर्श आशीर्वाद घ्यावा " म्हणत अख्खी पंढरी दुमदुमते.
जगण्याच्या असंख्य वाटांवर अनेक स्पर्शांचे कळत नकळत आधार घेत आपण पुढे जात असतो. त्या त्या वेळी ते ते स्पर्श मोलाची कामगिरी करत असतात, जेणेकरून पुढे जाऊन वेदनाही सुखावह होते. "वेदनेला उमजे, मायेचा पदर... स्पर्शाची भाषा, शब्दातीत सादर." बऱ्याचं अंशी हे स्पर्श आपण गृहीतचं धरून चालतो. परंतु त्यांना मुकल्यानंतर त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आयुष्यात जाणवू लागते आणि हलक्याशा भावभरल्या स्पर्शासाठी मन आसुसते. तेव्हा काय काय दाटून येतं ठाऊक आहे का? नात्यात पडलेली वजाबाकी आठवते. भाग काढून घातलेला विचित्र गुणाकार साठू लागतो आणि कळू लागत बेरजेचं गणित. "स्पर्शाची दुनिया सारी, भावार्थ सांगून जाती, स्पर्शाभोवती हळवी, वसती नाजूक नाती..." पुढे स्पर्शाच्या उतरंडीमध्ये वरच्या स्थानावर ज्याची वर्णी लागते तो म्हणजे पारदर्शी मैत्रीचा नितळ आरस्पानी स्पर्श होय. ज्याला स्त्री पुरुष भेदाभेद वय, प्रांत, भाषा अशी कोणतीही भिंत अडवू शकत नाही.
मैत्री करून पाहावी आणि तेवढीचं निभवावी. दुर्बिणीतून न्याहाळावी तशी स्पर्शाची विविध रूपं समोर येऊ लागतात. स्पर्श नजरेचाही असतो. आश्वासक, आधार देणारा, जपणारा, जोजवणारा, आनंदयात्री, डोळ्यांत आसवं आणणारा, घाबरणारा, घाबरवणारा, किळसवाणा, ओंगळ नजरेचा स्पर्श प्रत्यक्ष शरीर स्पर्शापेक्षाही प्रभावी ठरतो. तान्ह्या बाळाचा स्पर्श हा पृथ्वीतलावरील सर्वात लडीवाळ मुलायम स्पर्श होय. मलिनतेच्या लाटांपासून दूर असलेला पवित्र निसर्गाचा स्पर्श. थंडीच्या दिवसात अंगाशी लगट करणारे बोचरे वारे आठवून पाहा. आठवून पाहा पावसाच्या पहिल्या थेंबाने रोमांचित झालेले मन...अख्खा श्रावण मनासह शरीर कार्यान्वित करतो. नेहमी वरच्या क्रमांकावर असलेला, दाटीवाटीच्या युगल मिठीत, लग्नगाठ बांधण्यासाठी सरसावलेला चोर स्पर्श. "प्रेमाची भेट प्रेमाच्या गाठी ओलावा संपताच उरत नाहीत पाठी... आठवांचा खेळ उगा मागे उरतो, रागरूसव्यात जो तो गुदमरतो... त्याच्या-तिच्या सानिध्यातील आठवून पाहा संध्याकाळ... पहिली भेट, मावळतीचा सूर्य... बोचणारा वारा, नजर गुपित, घट्ट धरलेला हात! मनीची भाषा, अवगेल का त्याला? तूच माझी राणी, तो त्या दिवशी म्हणाला... हाती तुझा हात दे काहीतरी गुणगुणला... तू फक्त हो म्हण, तो हरपला... हीच माझी ओढ अन्, हाच खरा जिवलग... मी ही लाजून हो म्हंटल जरा! तो म्हणाला, भेटीत हवा विश्वास ज्याने वाढेल सहवास... सहवासावर रचू सुखाचा संसार... स्पर्श करता वेलीला येई आकार. तूच माझी राणी अन् मी तुझा सखा... सुखी जीवनात सहवासी स्पर्श हवा.
निसर्गाने स्पर्शाची एक सुंदर देणगी आपल्याला बहाल केलेली आहे. स्पर्श म्हणजे अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम. विशेष उल्लेखनीय म्हणजे घरातील, समाजातील, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना कपडालत्ता, औषध, पैसा, अन्नपाणी या गोष्टी पलीकडे आसं असते मायेच्या संवादाची.
आपले म्हणणे मांडण्याची, दुसऱ्याचे ऐकण्याची आणि सर्वांच्या पलीकडे एक खोल आस असते स्पर्शाची. घरातील ज्येष्ठांना असा स्पर्श आपण मागे कधी केलाय का? आठवून बघा. नसेल ना आठवत...! तर एक गोष्ट करा. त्यांच्याजवळ बसा. त्यांचा हात आपल्या हातात घ्या. डोक्यावरून मायेने हात फिरवा, आणि पहा साधे वाटणारे स्पर्श काय काय किमया करतात ते. निसटून गेलेल्या स्पर्शाचे सुरेख पैलू अनुभवून तर पहा. केवळ स्पर्शाने चमत्कार झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. विस्मृतीत गेलेल्या स्पर्श अनुभूतीच्या आठवणीत आपला दिवस गोड जावा म्हणून हाती घेतलेल्या मोरपंख ललितबंध लिखाणावरील दौतस्पर्श आपल्या सेवेशी सादर आहे.