Tuesday, January 20, 2026

भारतावर पुन्हा होणार दहशवादी हल्ला ? व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

भारतावर पुन्हा होणार दहशवादी हल्ला ? व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

कराची : सोशल मीडियावर पाकिस्तानातून भारताला उद्देशून केलेले धमकीचे व्हिडीओ नवे नाहीत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका नव्या व्हिडीओमुळे सुरक्षा यंत्रणांचं लक्ष वेधलं गेलं आहे. या व्हिडिओचा संबंध कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा संघटनेशी जोडला जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा भारतावरील संभाव्य दहशतवादी कारवायांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्या राजकीय आघाडीशी संबंधित काही लोक दिसत आहेत. या फूटेजमध्ये पाकिस्तानातील तरुणांना विशेष स्वरूपाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचा दावा करण्यात येतो. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण जमिनीवर नव्हे, तर पाण्यातील कारवायांसाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकारामुळे २६/११  च्या मुंबई हल्ल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. कारण त्या वेळी दहशतवादी समुद्रमार्गे भारतात घुसले होते. त्यामुळेच आता लष्कर-ए-तोयबा पाण्यातील लढाईसाठी तयारी करत असल्याचा दावा किती गंभीर आहे, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्हिडीओमध्ये स्वतःला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचं सांगणारा एक व्यक्ती ‘हरीश डार’ नावानं ओळख देतो. तो सांगतो की, तरुणांना स्कुबा डायव्हिंग, पोहणे, बोटी हाताळणे आणि आपत्कालीन बचाव सराव अशा बाबींचं प्रशिक्षण दिलं जात आहे. याशिवाय ‘वॉटर फोर्स’ उभारण्याचा दावाही या व्हिडिओत करण्यात आला आहे. या दाव्यानुसार आतापर्यंत शंभराहून अधिक जणांना बोट चालवण्याचं प्रशिक्षण दिलं असल्याचंही सांगण्यात येत आहे. हे वक्तव्य केवळ प्रचारासाठी आहे की भविष्यातील कटाचा भाग आहे, याचा शोध घेणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी नेटवर्कवर कारवाई केल्यानंतर तेथून सातत्याने आक्रमक आणि द्वेषपूर्ण वक्तव्यांचा सूर वाढलेला दिसतो. त्याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणा अशा व्हिडिओंवर बारकाईने लक्ष ठेवून असून, केवळ सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास न ठेवता त्यामागची सत्यता तपासली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, अशा प्रकारचे संदेश आणि प्रशिक्षणाचे दावे ही बाब हलक्यात घेण्यासारखी नसल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा