मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. मात्र महापौर पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उबाठाचे नगरसेवक नॉटरिचेबल झाल्यामुळे मुंबईतील ६५ नगरसेवकांवर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे. विरोधी पक्षात बसावे लागणाऱ्या उबाठातील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यांच्यावर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे.
भाजपचे यंदा पालिकेत सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची गरज आहे. उबाठाकडून महापौर पदाची जाहीर इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्रे येथील एका हॉटेलला बोलावले. तेव्हापासून हे नगरसेवक तिथेच थांबले आहेत. मात्र, यावरून हॉटेल पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली. मित्रपक्ष भाजपनेही सतर्कतेची पावले उचलली असून त्यांच्या सर्व नगरसेवकांना पुढील १० दिवस मुंबईतच राहण्याचे निर्देश दिले आहेत.






