Tuesday, January 20, 2026

शिर्के कुटुंबाने घेतला बदला

शिर्के कुटुंबाने घेतला बदला

उबाठातून शक्य झाले ते मनसेत जावून विजय मिळवून दाखवला

मुंबई : मुंंबई महापालिकेच्या निवडणुकी प्रभाग क्रमांक १२८मधून शिवसेनेचे अश्विनी दिपक हांडे या पराभूत झाल्या आहेत. मनसेच्या सई सनिल शिर्के यांनी त्यांचा पराभव केला. माजी नगरसेविका शुभांगी शिर्के यांच्या त्या सूनबाई असून बाबा हांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवत तत्कालिन शिवसेनेच्या शुभांगी शिर्के यांचा पराभव केला होता. त्यानंतर मागील निवडणुकीत शुभांगी शिर्के यांनी अपक्ष निवडणूक लढवत अश्विनी हांडे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. पण त्यातही अश्विनी हांडे यांनी अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी शिर्के यांचा पराभव केला होता. परंतु आधी शिवसेना, त्यानंतर अपक्ष म्हणून हांडे कुटुंबाचा पराभव करू न शकणाऱ्या शुभांगी शिर्के यांनी आपल्या सुनेला मनसेकडून उमेदवारी मिळवत विजयी केले आणि मागील दोन निवडणुकांमधील पराभवाचा वचपा काढला.त्यामुळे जे शिवसेनेत राहून करता आले नाही ते शिर्के कुटुंबाने मनसेत राहून करू दाखवले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सन २०१२मध्ये अपक्ष म्हणून दिपक बाबा हांडे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असलेल्या शुभांगी दशरथ शिर्के यांचा पराभव करत निवडून आले होते. या निवडणुकीत मनसेच्यावतीने राजा चौगुले तर शिवसेनेच्यावतीने शुभांगी शिर्के तसेच अपक्ष म्हणून दिपक हांडे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या दिपक हांडे यांनी शुभांगी शिर्के यांचा पराभव करत मोठे जाईंट किलर ठरले होते. त्यानंतर हांडे यांनी तत्कालिन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सन २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे बाबा हांडे यांनी आपल्या पत्नीला म्हणजे अश्विनी हांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांना पाडण्यासाठी शुभांगी शिर्के यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत अश्विनी हांडे यांनी तब्बल ८ हजार मतांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीत अपक्ष शुभांगी शिर्के यांना ४९९० मते मिळाली होती.

तर २०२६च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२८ हा महिला आरक्षित झाल्यामुळे पुन्हा अश्विनी हांडे या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. पण हा प्रभाग मनसेच्या वाट्याला जातात शुभांगी शिर्के यांनी त्यांच्याकडे वर्णी लावत आपल्या सुनेसाठी उमेदवारी मिळवून घेतली. या निवडणुकीत सई सनिल शिर्के या १२ हजार ८३१ मते मिळवत विजय संपादन केला, आणि हांडे कुटुंबातील सदस्याचा पराभव केला. त्यामुळे जे शिवसेनेत राहून पूर्ण करता आलेले नाही ते शिर्के कुटुबाला आपल्या पराभवाचा बदला मनसेत जावून घेता आलेला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा