Tuesday, January 20, 2026

महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरांच्या खुर्चीवर पिठासिन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा

मुंबई : महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर खऱ्या अर्थांने राजकीय चुरस वाढीस लागणार आहे. महापालिका स्थापनेनंतर प्रथमच भाजपचे सर्वांधिक नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे महापालिकेत प्रथमच भाजपचा महापौर विराजमान करण्यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. सर्वांधिक नगरसेवक विजयी होऊनही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता मिळविण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या मदतीची गरज लागणार आहे. भाजपच्या याच अगतिकतेचा फायदा उचलत शिवसेनाही अडीच वर्षांकरीता महापौरपदाची मागणी करत आहे. महापौर निवडीला अजून काही दिवसांचा कालावधी असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला तसेच घोडेबाजाराला गती मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण लॉटरी सोडत काढली जाणार असून त्यामुळे महापौर पदासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये पिठासीन अधिकारी म्हणून महापालिकेच्या वरिष्ठ नगरसेवकाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे महापालिकेत सलग सात वेळा निवडून येण्याचा मान हा माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

तसेच झाल्यास महापौर निवडीदरम्यान महापौर पदाच्या खुर्चीवर पिठासीन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव बसतील आणि निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतील. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार असल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पिठासीन अधिकारी म्हणून स्वीकारण्यास भाजप आणि शिवसेना तयार होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेत महापौरांच्या निवडीवरून जोरदार खलबते सुरू असून महापौर कुणाचा होणार यावरून माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यातच महापौरांचे आरक्षण न पडल्याने कोणत्या आरक्षित प्रवर्गातील नगरसेवकाची वर्णी लागणार आणि कोणत्या पक्षाची दावेदारी असणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही; परंतु आता याबाबत येत्या २२ जानेवारी आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निघते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली गेल्यानंतर किमान सात दिवसांचा कालावधी विशेष सभेसाठी आवश्यक असल्याने तसेच उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी असणे यासाठीचा अवधी आणि साप्ताहिक सुट्टी तसेच बँक हॉलिडे वगळता ३१ जानेवारीपूर्वी महापौर निवडणूक होणे शक्य होणार नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवठ्यात महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक प्रक्रिया कोणाच्या माध्यमातून राबविणार?

दरम्यान, ही निवडणूक घेण्यासाठी यापूर्वी मावळते महापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते; परंतु महापालिकेची मुदत संपून पावणेचार वर्षे संपत आल्याने महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार महापौरांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांत जास्तवेळा तथा ज्येष्ठ नगरसेवक हा पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहतील असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सभागृहात सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक या उबाठाच्या श्रद्धा जाधव असल्याचे त्यांच्या नावाची घोषणा महापालिका सचिवांना निवडणुकीच्या दिवशी करून त्यांना पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करावे लागणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे श्रद्धा जाधव यांना महायुतीचे नगरसेवक स्वीकारतील का? महायुतीतील ज्येष्ठ नगरसेवकाला पिठासीन अधिकारीपदी बसवणार की आयुक्तांच्या माध्यमातूनच ही निवडणूक पार पाडायला भाग पाडली जाईल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Comments
Add Comment