अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने आदींचा कारवाईत समावेश
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून कारवाई
कुर्ला (पश्चिम) येथील विविध परिसरातील पदपथावरील अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे अशा एकूण ७१ बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून आज (दिनांक २० जानेवारी २०२६) निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, सह आयुक्त (परिमंडळ-५) श्री. देविदास क्षीरसागर यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (एल विभाग) श्री. धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई हाती घेण्यात आली होती.
कुर्ला (पश्चिम) येथील कुर्ला रेल्वे स्थानक परिसर, न्यू मिल मार्ग, बैल बाजार परिसर, विनोबा भावे नगर आदी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे अशा एकूण ७१ बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. यामध्ये, कुर्ला पोलिस ठाणे हद्दीतील ५३ आणि विनोबा भावे नगर पोलिस ठाणे हद्दीतील १८ असे एकूण ७१ अनधिकृत फेरीवाले, दुकाने व दुकानांचे वाढीव बांधकाम यांचा समावेश आहे.
अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४६ अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.
दरम्यान, सदर परिसरातील अनधिकृत तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात सक्तीची कारवाई करण्याबाबत ‘एल’ विभागाकडून संबंधित पोलिसांना कळविण्यात आले आहे. तसेच, यापुढेही अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.