मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याने एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार वर्षांच्या चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नुसरत नावाची चार वर्षांची मुलगी घराजवळ इतर मुलांसोबत खेळत होती. त्याचवेळी काही मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला केला. सोबतची मुले घाबरून पळून गेली, मात्र नुसरत त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली. कुत्र्यांनी तिला ओढत जवळच्या तलावाच्या दिशेने नेले. तलावाजवळ कुत्र्यांनी तिच्यावर वारंवार चावे घेतले. गंभीर जखमा झाल्याने आणि वेदना सहन न झाल्याने चिमुकलीने जागीच प्राण सोडले.
बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. शोध घेत असताना नुसरतचे वडील तलावाजवळ पोहोचले असता त्यांना मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे. लहान मुलांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.






