बविआकडे अनु. जमातीचे पाच, मागासवर्गीय तीन नगरसेवक
गणेश पाटील,विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर होणार आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यास बविआला केवळ आठ चेहऱ्यांमधून नवा महापौर निवडावा लागणार आहे. हेच आरक्षण महिलांसाठी राखीव झाल्यास एसटीमधील तीन तर एससी प्रवर्गातील केवळ दोनच महिला नगरसेवकांमधून एका महिलेला महापौर पदाची संधी दिली जाणार आहे. इतर मागासवर्ग या प्रवर्गाकरिता आरक्षण निघाल्यास बहुजन विकास आघाडीकडे ८ पुरुष नगरसेवक आणि ११ महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे महापौर पदाचे आरक्षण कोणत्याही राखीव प्रवर्गाकरिता निघाल्यास, फार मोजक्या नगरसेवकांमधूनच एकाचे ‘राजयोग’ येण्याची शक्यता आहे.
शासनाने राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत १३ नोव्हेंबर २०१९ रोजी काढली होती, तर १४ नोव्हेंबर रोजी त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. ही आरक्षण सोडत काढली तेव्हा २७ महापालिका होत्या. आता मात्र २९ महापालिका आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण २२ जानेवारी रोजी नव्याने काढण्यात येणार आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यापूर्वी सर्व महापालिका क्षेत्रातील २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या, तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची माहिती शासनाने मागितली आहे.
दरम्यान, वसई-विरार महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण एससी प्रवर्गाकरिता जाहीर झाल्यास बहुमतात असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे केवळ तीनच उमेदवार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील सरिता मोरे, प्रभाग १९ मधील लता कांबळे, आणि प्रभाग २० मधील प्रसन्न भातणकर यांचा समावेश आहे, तर एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यास प्रभाग क्रमांक १ मधील जयंत बसवंत, १९ मधील संतूर यादव, २५ मधील रोहिणी जाधव, २७ मधील ज्योत्स्ना भगली, तसेच प्रभाग २० मधील रमेश घोरकना हे पाच उमेदवार महापौर पदाचे दावेदार आहेत. ओबीसी या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यास बहुजन विकास आघाडीकडे एकूण १९ उमेदवार आहेत. त्यापैकी ११ ह्या नगरसेविका आहेत. ओबीसी महिलांमध्ये बहुजन विकास आघाडीकडे ॲड. अस्मिता पाटील, अमृता चोरघे, प्रतिमा पाटील, नीता घरत, रुपाली पाटील, ज्योती म्हात्रे, ॲड. दीप्ती भोईर, योगिता पाटील, प्रार्थना मोंडे, प्रमिला पाटील आणि अलका गमज्या ह्या ११ उमेदवार आहेत, तर पुरुषांमध्ये नरेंद्र पाटील, स्वप्निल कवळी, अतुल साळुंखे, प्रफुल पाटील, सुनील आचोळकर, आशीष वर्तक, कल्पेश मानकर आणि पंकज चोरघे हे नगरसेवक महापौर पदाचे दावेदार ठरू शकतात.
शेवटी कसं... आप्पा म्हणतील तसं
वसई-विरार महापालिकेत ११५ पैकी ७१ (पंजा निशाणीवरील एका उमेदवारासह) बहुजन विकास आघाडीकडे संख्याबळ आहे. त्यामुळे येथे बहुजन विकास आघाडीचाच महापौर होणार आहे ही बाब स्पष्ट आहे. महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गाकरिता, माहिलेकरिता किंवा कोणत्याही राखीव जागेसाठी जाहीर झाल्यास महापौर पदाचा निर्णय हा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर हेच घेणार आहेत. त्यामुळे महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सुद्धा हितेंद्र ठाकूर हे धक्का तंत्राचा वापर करत, वसई-विरारचा प्रथम नागरिक होण्याची संधी कुणाला देतात याबाबत कुणीही अंदाज बांधू शकत नाही.






