Tuesday, January 20, 2026

शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितले ही अफवा

शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितले ही अफवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; स्पष्ट जनादेशानंतर वादविवाद जनतेला आवडणार नाही

मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप-शिवसेनेत आलबेल नसल्याची चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर रोखठोक भाष्य केले आहे. “शिवसेनेने अडीच वर्षांकरीता महापौरपद मागितल्याच्या चर्चा या अफवा आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणुका लढविल्या आहेत. दावोस येथील परिषदेनंतर जेव्हा मी मुंबईला जाईन, तेव्हा आम्ही एकत्र बसून महापौर पदाबाबत निर्णय घेऊ. कोण महापौर होणार किंवा कोणाला कोणते पद मिळणार, अशा विषयात महायुतीत कोणताही संघर्ष अथवा वाद नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ते दावोसला रवाना झाले. महापालिका निकालांत विशेषतः मुंबईत भाजप आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, निकालानंतर शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने, महापौर पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दावोस येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर पदाबाबत भाष्य केले.

उद्धव ठाकरे आणि तुमच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत का, या प्रश्नावर या सर्व वावड्या आणि अफवा आहेत. ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची महायुती भक्कम आहे. महापौर पद किंवा इतर छोट्यामोठ्या पदांसाठी भांडत बसणार नाही. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. असा जनादेश मिळाल्यानंतर पदांसाठी भांडत बसणे योग्य नाही, लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे आम्ही ते करणारही नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत जनतेने भाजप आणि महायुतीला मोठे यश दिले. त्यामुळे आता ट्रिपल इंजिनासोबत ट्रिपल जबाबदारी वाढल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारातून हा विश्वास सार्थ करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment